पुणे दि. (punetoday9news ) :- पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाने हजेरी लावल्याने धरणे निम्मी भरली असून गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाणीसाठा १५.०३ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ५१.५६ टक्के एवढा झाला आहे . असाच पावसाचा जोर कायम राहिल्यास पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे .

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सोमवारी (३ ऑगस्ट) रात्रीपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली. सतत कोसळणारा पाऊस गुरूवारी सायंकाळपर्यंत कायम होता. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. गुरुवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ८५ मि. मी. , वरसगाव धरण परिसरात ८० मि.मी., पानशेत धरण परिसरात ८२ मि.मी. आणि खडकवासला धरण क्षेत्रात १८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
तर, गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर धरणात ४५ मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरणात अनुक्रमे ३७ आणि ३१ मि.मी., तर खडकवासला धरणात १२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सोमवापर्यंत चारही धरणांत ९.८२ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. हा पाणीसाठा गुरुवारी सायंकाळपर्यंत १५.०३ टीएमसी म्हणजेच ५१.५६ टक्के एवढा झाला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात ५४ मि.मी. पाऊस झाल्याने या धरणात ३.५९ टीएमसी पाणीसाठा आहे. अन्य महत्त्वाच्या धरणांपैकी गुंजवणी, नीरा देवघर, भामा आसखेड आणि भाटघर धरणांच्या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. गुंजवणी धरण परिसरात ७३ मि.मी., नीरा देवघर धरणात १०० मि.मी., भामा आसखेड धरणात २० मि.मी. आणि भाटघर धरणात ५९मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

Comments are closed

error: Content is protected !!