हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाला गती येण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठित

पुणे, दि. ८ (punetoday9news):- पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणासाठी लागणारी संरक्षण विभागाची परवानगी नुकतीच मिळाली असून पुणे महानगरपालिकेने सर्वेक्षणाचे काम गतीने सुरु करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो आणि पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या कामाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्किट हाऊस येथे आढावा बैठक घेण्यात आली, यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पुणे मेट्रो मार्गिका ३ हिंजवडी ते शिवाजीनगर कामकाजाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. मेट्रोचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व ‘पीएमआरडीए’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे कामकाज करावे, असे सांगितले. नागरिकांशी संवाद साधून मेट्रोचे काम जलदगतीने होण्यासाठी महापालिका व पीएमआरडीए मधील अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली. या समितीमध्ये माधव जगताप, नितीन उदास व सुनंदा गायकवाड यांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रोच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रकल्प निश्चिती, मान्यता, कामकाजाची सुरुवात, भूसंपादनाची सद्यस्थिती, केंद्र आणि राज्य शासनाची जागा, पर्यायी रस्ते तसेच अंमलबजावणीतील महत्त्वाचे टप्पे व प्रकल्प राबवण्यासाठी सुरु असलेल्या कार्यावाहीबाबतचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

विभागीय आयुक्त सौरभ राव, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे यांनी याविषयी माहिती देऊन कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी नियोजन केल्याचे सांगितले.

Comments are closed

error: Content is protected !!