जबाबदारी सांभाळण्यात निष्क्रियतेचा आरोप
पुणे,दि.८ (punetoday9news):- मराठा आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे मात्र महाविकास आघाडी सरकारकडून न्यायालयात बाजू मजबूत मांडली जाताना दिसत नाही. आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण आहेत. मात्र त्यांनी आजवर कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेतले नाही. त्यामुळे त्यांना या पदावरून हटवावे अशी मागणी मराठा आमदार विनायक मेटे यांनी केली. मराठा समन्वय समितीची बैठक आज पुण्यात पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
आमदार मेटे म्हणाले की, मराठा आरक्षण बाबतचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. या आरक्षणासाठी राज्य सरकार मार्फत उपसमिती नेमण्यात आली. त्या उपसमितीचे अध्यक्षपद अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. यापुर्वी राज्याचे मुख्यमंत्रीपद असतानादेखील त्यांनी मराठा समाजासाठी कोणतेही ठोस निर्णय घेतले नाहीत . आता सरकारमधील उपसमितीचे अध्यक्षपद त्यांच्याकडे असताना देखील मराठा समजाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेत नाही. त्यामुळे अशोक चव्हाण यांना उपसमिती पदावरून हटविण्यात यावे व त्या पदावर महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या सारख्या कोणत्याही नेत्याला महाविकास आघाडीतील जबाबदारी द्यावी. अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री डोळे मिटून शांत बसले आहेत. अशोक चव्हाण यांना उपसमिती पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी नाशिक येथे उद्या क्रांती दिनी जागरण गोंधळ, मशाली पेटवून आणि काळे कपडे घालून आंदोलन करणार आहोत. मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा रद्द झाल्यास पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन करणार आहे. तसेच या पुढील काळात आघाडी सरकारमधील मंत्र्याच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
Comments are closed