पिंपरी । प्रतिनिधी :
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडियम स्कूल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये पाचवा आंतरराष्ट्रीय योगा दिवस योगाचे अनेक प्रकार करीत साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, तेजल कोळसे-पाटील, सर्व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.
प्रशालेतील खेळाचे शिक्षक जीवन सोळंकी यांनी विद्यार्थ्यांकडून योगाचे अनेक प्रकार करून घेतले. विद्यार्थ्यांनी सूर्याची प्रतिकृती करीत योगसाधना केली. याबरोबरच शिक्षिका वृषाली कोकणे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. योगाविषयी एका विशेष सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रशालेतील विद्यार्थ्याचे वडील सतीश बांदल यांनी फिटनेस क्षेत्रातील आपले अनुभव उपस्थितांना सांगत योगाचे महत्त्व पटवून दिले. आरोग्यदाई जीवन जगायचे असेल तर केवळ २१ जून रोजीच योगासने न करता वर्षभर केली तर शरीर व मन प्रसन्न राहील. स्पर्धेच्या आणि धावपळीच्या युगात शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल तर भारतामधील योगाची परंपरा जोपासणे आवश्यक आहे. या कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
फोटो ओळ : अरविंद एज्युकेशन सोसायटीत विद्यार्थ्यांनी सूर्याची प्रतिकृती करीत योगसाधना केली.
Comments are closed