पुणे, दि.९ (punetoday9news) :- वेगळी वीजयंत्रणा उभारण्याची गरज नसलेल्या पेडपेडींग घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजजोडण्या येत्या आठवड्याभरात कार्यान्वित कराव्यात तसेच एचव्हीडीएस व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील वीजजोडण्या कार्यान्वित करण्यास आणखी वेग द्यावा असे निर्देश पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी दिले.

पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडलातील विविध योजना व कामांची आढावा बैठक गुरुवार (दि. ७) व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. यावेळी नाळे बोलत होते. बैठकीला मुख्य अभियंता सुनील पावडे (बारामती), सचिन तालेवार (पुणे), अंकुर कावळे (प्रभारी-कोल्हापूर) यांची उपस्थित होते .
नाळे म्हणाले, पुणे प्रादेशिक विभागामध्ये सर्व मंडल कार्यालयांना मुबलक प्रमाणात वीजमीटर देण्यात आले आहे. त्यामुळे वेगळी वीजयंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा सर्व वीजजोडण्या येत्या आठवड्याभरात कार्यान्वित कराव्यात. ज्या वीजजोडण्यांसाठी नवीन वीजयंत्रणा उभारणे आवश्यक आहे त्याचे काम देखील ताबडतोब करण्यात यावे. याकामी अधीक्षक अभियंत्यांनी स्वतः पाठपुरावा करावा. उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील मंजूर वीजजोडण्या येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याप्रमाणे कामांना वेग देण्यात यावा. तसेच मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेची जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी सौर प्रकल्पांसाठी जागांची निवड करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात यावे, असे निर्देश दिले.

कोविड रुग्णालये, गृहसंस्थांना पर्यायी वीजपुरवठ्याची सोय – पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सर्व कोविड-19 रुग्णालयांना महावितरणकडून पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून ठेवावी. सोबतच या रुग्णालयांतील स्वयंचलित जनरेटर (डीजी सेट) देखील सुस्थितीत असल्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधीत पालिकांचे विद्युत विभाग यांच्या समन्वयातून करण्यात यावी.

शहरी व ग्रामीण भागामध्ये अकृषक वितरण रोहित्रांच्या नादुरुस्तीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी पुणे प्रादेशिक विभागात ‘बिघाडरहित अकृषक रोहित्र अभियान’ राबविण्यात येत आहे. त्यानुसार संबंधीत कंत्राटदारांकडून सर्व वितरण रोहित्रांची देखभाल व दुरुस्तीची कामे वेगाने करण्यात यावी. रोहित्र अतिभारित असल्याचे दिसून आल्यास त्याची क्षमतावाढ करण्यात यावी. यानंतरही अकृषक वितरण रोहित्र नादुरुस्त झाल्यास त्याच्या कारणमिमांसेत दोषी आढळलेल्या संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट केले. या बैठकीमध्ये उपमहाव्यवस्थापक (आयटी) एकनाथ चव्हाण यांच्यासह पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडलातील सर्व अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

 

Comments are closed

error: Content is protected !!