अतिरिक्त पदभार आयुष प्रसाद यांच्याकडे
पुणे . दि. १० (punetoday9news):- पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली करण्यात आली आहे त्यामुळे पुण्याच्या जिल्हाधिकारी रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोरोनाची गंभीर स्थिती पाहता जिल्हाधिकाऱ्यांचे हे रिक्त पद लवकर भरले जाण्याची अपेक्षा आहे . आता या पदावर कोण येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल .यासाठी तीन अधिकाऱ्यांची नावं सध्या स्पर्धेत असल्याचे वृत्त मिळाले आहे . यास एका इंग्रजी वृत्तपत्रानेही दुजोरा दिला आहे .
राम हे रविवार (दि. ९) रोजी पंतप्रधान कार्यालयातील पदाचा पदभार घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत . त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी हा निर्णय घेऊन तास आदेश जारी केला आहे .
सौरभ राव यांनी नव्या जिल्हाधिकाऱ्यांची राज्य सरकारकडून लवकरच घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. दरम्यान, जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाच्या स्पर्धेत असलेल्या नावांविषयीची माहिती दिली. जिल्हाधिकारी पदासाठी तीन नावं सध्या स्पर्धेत आहेत. यात पहिलं नाव सध्याचे हाफकिन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि यवतमाळचे माजी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे आहे. तर दुसरे नाव लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे आहे व तिसरे नाव योगेश म्हसे यांचे आहे. म्हसे हे सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक असून यापूर्वी पिंपरी चिंचवड नवीन नगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पहिले आहे.
“हो. ही तीन नावं सध्या पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाच्या स्पर्धेत आहेत. तिन्ही अधिकारी अनुभवी आहेत,” असं विभागीय आयुक्त राव यांनी म्हटले आहे.
Comments are closed