पिंपरी, प्रतिनिधी :
वयाच्या पाचव्या वर्षापासून परिस्थितीशी झगडत हॉटेल, बार अशा ठिकाणी काम करून शिक्षण पूर्ण केले. पैशाचे कारण पुढे करीत शिक्षण बंद न करता दिवाणी न्यायालयात पट्टेवाल्याचे काम करत मेहनतीच्या जोरावर एका तरुणाने डॉक्टरेट मिळवीत यश खेचून आणले. कुंडलिक चिंधू पारधी असे या तरुणाचे नाव आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कुंडलिक चिंधू पारधी यांना कला शाखेअंतर्गत मराठी विषयातील पीएच.डी. पदवी नुकतीच जाहीर झाली. त्यांनी ‘हाकारा या नियतकालिकाचे वाड्.यीन कार्य’ या विषयावर प्रबंध सादर केला़. त्यांना इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, सचिव रामदास काकडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले, डॉ. मनोहर जाधव, डॉ. विश्वनाथ शिंदे, मराठी विभागप्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. प्रमोद धिवार, डॉ. संतोष चव्हाण, सीमा मलघे यांनी अभिनंदन केले.
कुंडलिक चिंधू पारधी यांनी अत्यंत चिकाटीने आणि मेहनतीने शोधप्रबंध पूर्ण करीत हे यश मिळविले. सलग 25 वर्षे वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करीत परिस्थितीवर विजय मिळवित पीएच.डी. पूर्ण केली. हॉटेल, बार अशा ठिकाणी पडेल ते काम करीत यशाला गवसनी घातली.
कुंडलिक चिंधू पारधी यांचा जन्म अकोले तालुक्यातील (अहमदनगर) ढगेवाडी या छोट्या आदिवासी पाड्यात झाला. कुटुंबाची परीस्थिती हलाखीची असल्यामुळे जगणे अवघड होते. त्यामुळे कुंडलिकच्या आईने जीवनाला कंटाळून आपल्या दोन लहान मुलांसह विहरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी कुंडलिक अवघे पाच वर्षाचे होते. तेव्हापासून त्यांनी शासकीय आश्रम शाळा, मवेशी इथे प्राथमिक शिक्षण घेतले, त्यानंतर त्यांनी आश्रमशाळा, अकोले इथे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. लहानपणीच आईचे छत्र हरवल्याने पुढील सर्व जीवन कुटुंबाबाहेरच गेले.
शिक्षण घ्यायचेच, अशी जिद्द कुंडलिक यांनी मनी धरली होती. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेक छोटी मोठी कामे करावी लागली. हॉटेलमध्ये वेटरची कामे करून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात क्रीडा क्षेत्रात मल्लखांब आणि क्रॉस कंट्री सारख्या खेळात राज्यस्तरावर यश मिळविले. त्यानंतर नाशिक येथे अर्धवेळ काम करीत बी.एड. चे शिक्षण पूर्ण केले. पुढे 2010-11 साली एम. ए. करण्यासाठी पुणे विद्यापीठात प्रवेश घेतला. घरून कसलेही पैसे मिळण्याचा मार्ग नसल्याने केटरिंगच्या कामाला जाऊन शिक्षणासाठी पैसे जोडले. याबाबत कुंडलिक म्हणतात, की शिक्षणासाठी वाट्टेल ते काम करण्याची माझी तयारी होती. गरिबीने खूप छळले होते, पण शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. पडेल ते काम करून, कधी कधी उपाशीपोटी दिवस काढून शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. एम.ए. नंतर लगेच एम.फील पदवीसाठी प्रवेश मिळाला होता. एम.फील सुरु असतानाच लग्न झाले. लग्न आणि शिक्षण या दोन्हींची सांगड घालतच नेट /सेट परीक्षा उत्तीर्ण झालो. त्यानंतर पुणे विद्यापीठातच पीएच.डी.साठी प्रवेश मिळाला. पीएचडी करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड दिवाणी न्यायालयात पट्टेवाल्याचे काम सुरु केले. पण इकडे पीएच.डी. पदवी पूर्ण करण्याची मनीषा होतीच. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपला अभ्यास करीत पीएच.डी. पदवी प्राप्त केली.
कुंडलीक हा अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी असून, त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असली, तरी त्याने परिस्थितीशी दोन हात करीत शिक्षण पूर्ण केले. त्याची ही जिद्द व चिकाटी आदर्शवत आहे. सामाजिक भान आणि आपण समाजाचे काहीतरी कल्याण करू शकतो, या प्रेरणेतून त्यांनी या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे पारधी यांचे मार्गदर्शक डॉ. संभाजी मलघे यांनी सांगितले.
Comments are closed