नवी सांगवी,वार्ताहर :
पिंपळे गुरव येथील सृष्टी चौक ते जवळकरनगर या कायम रहदारी असलेल्या रस्त्यावर दुभाजक बसविण्यात आल्याने अपघातात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे दुभाजक म्हणून बसविण्यात आलेले सिमेंटचे ब्लॉक काढण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
बीआरटीएस रस्त्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम सुरु आहे. त्यामुळे बीआरटीएस रस्त्याकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून वाहनचालक सृष्टी चौकातून वळून बीआरटीएस रस्त्यावर निघतात. मात्र, सृष्टी चौक ते जवळकरनगर चौकापर्यंतच्या 12 मीटर रस्त्यावर दुभाजक केला आहे. इथे पादचाऱ्यांची वर्दळ असते. दुभाजक टाकल्यामुळे वाहने संपूर्ण रस्ता व्यापून टाकतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ताच राहत नाही. परिणामी या ठिकाणी सतत छोटे मोठे अपघात होऊन पादचारी जायबंदी होत आहेत.
मुळात 12 मीटर रस्त्यावर नियमानुसार दुभाजक बसवता येत नाहीत. असे असतानाही या रस्त्यावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे. या ठिकाणच्या दुभाजकामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ताच उरलेला नाही. परिणामी अपघात होत आहेत. नागरिकांची यातून सुटका करण्यासाठी आणि नित्याची वाहतूककोंडी टाळण्यासाठी हे दुभाजक काढून टाकण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
Comments are closed