पिंपरी,दि.१५(punetodaynews) :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत समाजातील तळागाळातील अंध, अपंग, सफाई कामगार, तसेच गरजू २२५ कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. याबरोबरच भंडारा डोंगर येथे सुरू असलेल्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आला.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे श्रीक्षेत्र भंडारा डोंगर, श्रीक्षेत्र सावरगाव अशा अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्य करण्यात आले. तसेच केवळ लागवडीचे काम केले नसून, लावलेल्या झाडांना पाणी देण्याची सोय करत एक नवीन योगदान दिले आहे. तसेच ३ ते ४ फूट उंचीच्या ५०० रोपांचे वाटप करण्यात आले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे सुरू असलेल्या मंदिरासाठी मदत म्हणुन एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद पाटील, ट्रस्टचे सचिव जोपासेठ पवार, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ नाटक पाटील, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, वामन भारगंडे, ह.भ.प. मामा ढमाले, समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, विजय वडमारे आदी उपस्थित होते.

सांगाती फाउंडेशनने सुरू केलेल्या कामगार आणि कारखानदार यांची सांगड या उपक्रमाअंतर्गत बांधकाम क्षेत्रातील सुतार, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, प्लंबर, सुरक्षा रक्षक, सफाई कर्मचारी, हेल्परसह अनेक क्षेत्रातील कामगारांना कोविड कवच देण्यात आले आहे. यामध्ये अरुण पवार यांनी दहा कामगारांच्या कोविड कवच विम्याचा पहिला हप्ता भरला. तसेच तीनशेहून अधिक शेतकरी बांधवांचे “पीएम किसान योजने”चे मोफत फाॅर्म भरुन दिले. विजय वडमारे यांच्या सहकार्याने अनेक अंध आणि अपंग व्यक्तींची सेवा करीत मोफत ”शाॅप एक्ट ” तसेच उद्योग आधार” काढून दिले आहेत. याबरोबरच तब्बल पस्तीस विधवा महिलांसाठी “संजय गांधी निराधार पेन्शन योजने” च्या माध्यमातून पेन्शन सुरू करण्यात आली.
आज या भयानक परिस्थितीत अनेकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून गरजूंना मदतीचा हात देत आपला वाढदिवस साजरा केल्याचे अरुण पवार यांनी सांगितले.

Comments are closed

error: Content is protected !!