पिंपरी,दि.१५(punetodaynews):- ‘तुम्हाला अमेरिकन लोकांना खोटं सांगितल्याचा खेद वाटतो का,’ असा थेट सवाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना एका पत्रकाराने विचारला.
“मिस्टर प्रेसिंडेट, तुम्ही अमेरिकन लोकांना ज्या सगळ्या खोट्या गोष्टी सांगितल्यात, त्याबद्दल आज साडेतीन वर्षांनी तुम्हाला खेद वाटतो का?”अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत विचारण्यात आलेल्या थेट प्रश्नाने राष्ट्राध्यक्ष ट्रंप गडबडलेले दिसले.
प्रश्न ऐकू न आल्याचं भासवत त्यांनी विचारलं, “काय सगळं?” (All the What?)त्यावर दाते यांनी म्हटलं, “सगळ्या खोट्या गोष्टी, असत्य…जे तुम्ही सांगितलंत.”
ट्रंप या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून थेट पुढच्या प्रश्नावर गेले. पण हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराची चर्चा सुरू झाली. शिरीष दाते हफिंग्टन पोस्टचे ‘व्हाईट हाऊस कॉरस्पाँडंट’ म्हणजेच व्हाईट हाऊसचं वार्तांकन करणारे प्रतिनिधी आहेत. हा प्रश्न विचारल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.
या पत्रकार परिषदेनंतर दातेंनी ट्वीट केलं, “पाच वर्षं मला त्यांना हे विचारायचं होतं.” दाते यांनी विचारलेल्या या प्रश्नानंतर सोशल मीडियावरून एकीकडे ट्रंप विरोधक त्यांचं कौतुक करत आहेत, तर ट्रंप यांचे समर्थक त्यांच्यावर टीका करत आहेत.
एस. व्ही. दाते या नावाने लेखन करणाऱ्या शिरीष दातेंनी जानेवारी महिन्यात ‘द मिनिस्ट्री ऑफ अनट्रुथ’ (The Ministry Of Untruth) नावाचा एक प्रदीर्घ लेख लिहिला. ट्रंप यांनी आतापर्यंत वेळोवेळी केलेले दावे आणि विधानं या लेखात पडताळून पाहण्यात आली आहेत.
Everyone knows the president lies. Most people understand he does it every day, about pretty much everything. We’ve gotten used to it.
What we forget is just how corrosive it is to our democracy.https://t.co/JynnEtEoZB
— S.V. Dáte (@svdate) January 15, 2020
शिवाय दाते ट्रंप यांच्या दाव्यांतल्या विरोधाभासांबद्दल वेळोवेळी ट्वीट्सही करत असतात.
दाते गेली तीस वर्षं अमेरिकेत पत्रकार म्हणून काम करतायत. हफिंग्टन पोस्टच्या आधी त्यांनी असोसिएटेड प्रेस, द पाम बीच पोस्ट, नॅशनल जर्नल आणि NPR साठी काम केलंय.
एस. व्ही. दाते यांनी आतापर्यंत ५ कादंबऱ्याही लिहिल्या असून २ राजकीय व्यक्तिमत्त्वांची चरित्रं लिहिली आहेत. यामध्ये फ्लोरिडाचे माजी गव्हर्नर जेब बुश यांच्या चरित्राचा समावेश आहे.
शिरीष दाते यांना सेलिंगची आवड आहे. ट्विटरच्या त्यांच्या प्रोफाईलमध्येही त्यांनी ते लिहिलेलं आहे. ‘जुनो’ नावाच्या ४४ फुटांच्या यॉटवरून दाते आणि त्यांच्या २ मुलांनी अटलांटिक महासागर पार करत पुढे भूमध्य समुद्रापर्यंत प्रवास करून कॅरिबयन बेटांमार्गे परत अमेरिकेपर्यंत तब्बल दोन वर्षं १५,००० सागरी मैलांची सफर केल्याचा उल्लेख हफपोस्टच्या त्यांच्या प्रोफाईलवर आहे. शिरीष दाते यांचा जन्म १९६४ मध्ये पुण्यात झाला. ते ३ वर्षांचे असताना त्यांचे आईवडील अमेरिकेत स्थायिक झाले अशी माहिती एनसायक्लोपिडियावर आहे.
Comments are closed