मुंबई,दि.२१ ( punetoday9news ):- राज्यातील विविध भागांमध्ये पावासाचा जोर वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाकडून आगामी ४८ तासांसाठी ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी व घाट परिसरातील काही भाग व जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्राचा घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
”बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत आहे. त्याच अनुषंगाने कोकण किनारपट्टी व मध्य महाराष्ट्राचा घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आगामी ४८ तासांमध्ये ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी व घाट परिसरातील काही भागांसाठी व काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सोबतच वाऱ्यांचा वेग ४५ ते ५५ किलोमीटर इतका असणार आहे. मच्छिमार बांधवांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.” अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

मुंबईत पावसाची संततधार कायम असून, गुरूवारी रात्रीपासून पावसानं जोर धरला आहे. मागील काही तासांपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दुसरीकडे समुद्राला उधाण येणार असून मोठ्या लाटा उसळणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

मागील २४ तासांत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत विक्रमी पावसाची नोंद झाली असून, पुढील २४ तासात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणासह राज्याच्या इतर भागातही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे शुक्रवारी (२१ ऑगस्ट) दुपारी दीड वाजता समुद्रात ४.७४ मीटर उंचीच्या लाटा उसळणाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

Comments are closed

error: Content is protected !!