दिल्ली,दि.२२( punetoday9news):-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊन मध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता केंद्र सरकारने देशभरात कुठेही सामान आणि प्रवाशी वाहतुकीसाठी ई पासची गरज लागणार नाही, असं स्पष्ट केले आहे. याबाबतच केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना निर्देश जारी केले आहेत. तसेच या नियमावलीची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निर्बंधांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचंही समोर आलं. त्यामुळेच केंद्र सरकारने नव्याने हे निर्देश जारी केले आहेत.

केंद्र सरकारच्या निर्देशांमध्ये म्हटले आहे, “देशभरात विविध राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये वाहतुकीवर अनेक निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यामुळे राज्यांमध्ये होणाऱ्या वस्तूंच्या आणि सेवेच्या वाहतुकीच्या दळणवळणावर परिणाम होत आहे. यामुळे अनेक वस्तूंच्या पुरवठ्यावर वाईट परिणाम होत आहे.

“वाहतुकीवरील अनेक निर्बंधामुळे आर्थिक घडामोडींवर आणि रोजगारावर नकारात्मक परिणाम होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून किंवा राज्य सरकारांकडून लादले जाणारे हे निर्बंध गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सुचनांचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारांनी राज्यांतर्गत आणि देशात कुठेही सामान वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध लादू नयेत,” असं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

Comments are closed

error: Content is protected !!