पुणे,दि.२२( punetoday9news):-  जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर आज प्रथमच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी इंदापूर, बारामती आणि पुरंदर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या प्रतिबंधाकरीता करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी केली.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी इंदापूर मधील  कोविड केअर सेंटर तसेच उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या खाटांची क्षमता व वापर, स्राव नमुना तपासणी सुविधा, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट, उपचार सुविधा, स्वच्छता व पाणीपुरवठा तसेच आहार व्यवस्था, औषधे व साधनसामग्री तपासणी, रिपोर्टिंग पध्दती, रुग्णवाहिका व्यवस्थापन, नोडल ऑफिसर व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.सणसर येथील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये भेट देत एन्ट्री व एक्झिट पॉईंटसंदर्भात चर्चा केली.

बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालय, सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी भेट दिली व तेथे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजयकुमार तांबे यांनी सविस्तर माहिती दिली.  खंडोबानगर येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या.

पुरंदर तालुका प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच कोवीड केअर सेंटरची पाहणी त्यांनी केली.प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed

error: Content is protected !!