अहमदनगर,दि.२३( punetoday9news):-  भारत देश हा सर्व धर्म समभाव या उक्तीप्रमाणे चालतो.  याचा प्रत्यय पहावयास मिळाला शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे पार पडलेल्या एका लग्न समारंभात. या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मामाने हिंदू भाचींचा विवाह लावला. त्यामुळे या लग्नाची सध्या चर्चा सुरु आहे. या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

बोधेगावच्या सविता भुसारी या शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. संसाराच्या वाटेत पतीने अर्ध्यावरच साथ सोडल्याने त्या माहेरी आल्या. तिथेच त्यांनी दोन्ही मुलींना लहानाचे मोठे केले. बोधेगावातील त्यांच्या घराशेजारी बाबा पठाण नावाचे गृहस्थ राहतात. सविता भुसारी यांनी त्यांना भाऊ मानले . त्यामुळे सविता यांच्या मुलींच्या लग्नात बाबा पठाण हे मामा म्हणून उभे राहिले.

सविता भुसारी या दरवर्षी पठाण यांना राखी बांधतात. त्यामुळे मुलींच्या लग्नात त्यांनी मामाची भूमिका खंबीरपणे निभावली. भुसारी कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असल्याने मुलांच्या शिक्षणासाठीही बाबाभाईंनी हातभार लावला. सविता यांची मुलगी गौरी बी.ए. झाली. तर धाकटी सावरी हिची बारावी झाली.

दोघींच्या लग्नाचे वय झाल्यावर स्थळासाठी शोधाशोध केली. तालुक्यातील मुंगी येथील स्थळ आले. तिथेही दोन सख्ये भाऊ लग्नाचे होते. त्यामुळे बाबाभाई यांनीच पुढाकार घेत ते दोघे भाऊ आणि या दोघी बहीणी यांचे लग्न लावून दिले. त्यामुळे धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन या लग्नात घडले.

 

व याचीच चर्चा सर्वत्र सोशल मेडिया च्या माध्यमातून समाजात होत आहे.  मामा असावा तर असा.


Comments are closed

error: Content is protected !!