पुणे,दि.२३ (punetoday9news ):- पुण्यामध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्वतंत्र कोविड रुग्णालय तसेच वैद्यकीय व्यवस्था उभी करणे आवश्यक होते. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ८०० खाटांचे हे सुसज्ज कोविड रुग्णालय अठरा दिवसांच्या अत्यंत कमी वेळेत बांधून पूर्ण केले आहे.
पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३२ हजार चौरस मीटर मैदानावर हे १३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे रुग्णालय उभे राहिले आहे. या रुग्णालयात ६०० खाटा संपूर्णपणे वातानुकूलित असून दोनशे खाटा या आयसीयू साठी स्वतंत्रपणे राखीव असतील. एखाद्या रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये असलेल्या सर्व सोयी सुविधा तसेच प्रशिक्षित डॉक्टर या कोविड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये सुद्धा आहेत. संपूर्ण परिसर, ज्यामध्ये व्यवस्थापन केंद्र, प्रयोगशाळा, औषध केंद्र, डॉक्टरांसाठी विश्रामगृह, उपहारगृह, रुग्ण येण्याचे ठिकाण, वाहनतळ इत्यादी सोयी सुविधा आहेत तसेच या दिव्यांगाच्या दृष्टीने सुद्धा सुखकर करण्यात आल्या आहेत. लिक्विड ऑक्सिजन टाकी तसेच राखीव ऑक्सीजन सिलेंडर यामुळे ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. ऑक्सीजनयुक्त सहाशे खाटांच्या संपूर्ण वातानुकूलित विभागामुळे हा देशातील सगळ्यात मोठ्या रुग्णालयात पैकी एक बनला आहे. कमी दाबाने वातानुकूलित करण्यात आलेल्या आयसीयूमुळे या विभागात कायम शुद्ध व स्वच्छ हवा खेळती राहील, याची दक्षता घेण्यात आली आहे. रुग्ण तसेच भेट द्यायला येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा परिसर रेड व ग्रीन झोनमध्ये विभागण्यात आला आहे. पुण्यात सरासरीच्या ७० टक्के पर्जन्यमान या दरम्यान होत असल्याने हे रुग्णालय जलरोधक व ताशी १२५ किलोमीटर वाऱ्याचा वेग सुद्धा सहन करू शकेल इतके भक्कम बनवण्यात आले आहे.
गेल्या १८ दिवसात जरी सातत्याने पाऊस होत होता तरी हे रुग्णालय वेळेत व सुसज्ज असे बांधून पूर्ण झाले आहे. त्यामुळेच कुठल्याही वातावरणात रुग्णालय पुढील सहा महिने भक्कम उभे राहील याची खात्री देता येईल. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच पुण्यातील इतर शासकीय आस्थापनांच्या सहकार्याने हे रुग्णालय उभे राहिले आहे. येणाऱ्या काळात हे रुग्णालय देशात उभे राहणाऱ्या कोविड रुग्णालयांसाठी मानक म्हणून पुढे येईल, अशी खात्री प्रशाशनाच्या वतीने व्यक्त केली आहे.
Comments are closed