मुंबई, दि.२६(punetoday9news):-
कोविडमुळे टाळेबंदीच्या काळात सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने वाहतूक क्षेत्राला फटका बसला. त्यांना नुकसान भरपाई म्हणून सार्वजनिक आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहन कर माफी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
दिनांक १एप्रिल ते ३० सप्टेंबर या ६ महिन्यांच्या कालावधीत वाहन कर भरण्यापासून १००% टक्के करमाफी देण्याचा म्हणजे २०२०-२०२१ या आर्थिक वर्षासाठी एकूण वार्षिक कराच्या ५० टक्के करमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
कोविड -१९ आजाराच्या साथीमुळे केंद्रशासनाने दिनांक २५ मार्च, २०२० पासून संपूर्ण देशात टाळेबंदी (लॉकडाऊन) घोषित केली होती. सदर टाळेबंदी दिनांक ३१ मे पर्यंत सुरु होती. त्यानंतर राज्य शासनाने दिनांक ३१ मे च्या आदेशान्वये Mission Begins Again अंतर्गत काही प्रमाणात टाळेबंदी खुली केलेली आहे. या टाळेबंदीच्या कालावधीत सार्वजनिक वाहतूक बंद होती. त्यामुळे विविध वाहतूक संघटनांनी नुकसान भरपाई म्हणून शासनाने करमाफी द्यावी, अशी विनंती केली होती.
करमाफी ही मालवाहतूक करणारी वाहने, पर्यटक वाहने, खोदकाम करणारी वाहने, खाजगी सेवा वाहने, व्यावसायिक कॅम्पर्स वाहने, स्कूल बसेस या वार्षिक कर भरणाऱ्या वाहनांना लागू राहणार आहे. यामुळे राज्य शासनास सुमारे ७०० कोटी एवढा कर कमी मिळणार असल्याने राज्य शासनावर तेवढा आर्थिक भार राहणार आहे.
Comments are closed