पुणे, दि.२६(punetoday9news):-  ‘चेस दी व्हायरस’ संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणाऱ्या व्यक्तीपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहोचले पाहिजे. त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, असे सांगतानाच ‘चेस दी वायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.
पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानावर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उप मुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण झाले. कार्यक्रमास महापौर उषा ढोरे, खा. श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे, खा. सुप्रियाताई सुळे, आ. माधुरीताई मिसाळ आदी मान्यवर या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.
“शाब्बास पुणेकर” .. तुम्ही दिलेल्या वेळेत भव्य असे कोविड रुग्णालय उभारले आहे, असे सांगून मुख्यमंत्री  म्हणाले, कोरोनाच्या संकटाला न घाबरता आपण सामोरे जात आहोत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातही अधिकाधिक चाचण्या करून बाधितांवर वेळेत उपचार करा तसेच वयोवृद्ध आणि इतर आजाराने बाधीत असलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्या.

मुख्यमंत्री म्हणाले, पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. असे सांगतानाच कोरोनाचे निदान करण्यासाठी आवाजावरून चाचणी मुंबईत सुरू केली आहे, ही चाचणी यशस्वी झाली तर कोरोना निदानाच्या मोहिमेत आपण मोठा टप्पा गाठू शकू, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

Comments are closed

error: Content is protected !!