दिल्ली,दि.३१(punetoday9news):- करोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी देण्यात आलेली मोरॅटोरियमची (कर्जहप्ते स्थगिती) सुविधा आज, सोमवारपासून (३१ ऑगस्ट) संपुष्टात येत आहे. ही सुविधा आणखी काही काळ चालू ठेवण्यास रिझर्व्ह बँक इच्छुक नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
मोरॅटोरियमची सुविधा संपुष्टात आल्यास संबंधितांना सप्टेंबरपासून कर्जाचे हप्ते भरावे लागणार आहेत.
करोना संक्रमणाचे आर्थिक परिणाम पाहता रिझर्व्ह बँकेने मार्च महिन्यापासून तीन महिने कर्जहप्ते स्थगितीची सुविधा देऊ केली होती. ही सुविधा १ मार्च ते ३१ मेपर्यंत लागू करण्यात आली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने ३१ ऑगस्टपर्यंत आणखी तीन महिने मुदत वाढवली. याचाच अर्थ सहा महिने कर्जहप्ते स्थगितीची सुविधा देण्यात आली.
एचडीएफसी लिमिटेडचे चेअरमन दीपक पारेख, कोटक महिंद्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांच्यासह अन्य बँकांच्या प्रमुखांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कर्जहप्ते स्थगितीचा कालावधी न वाढविण्याची विनंती केली होती. बँकांच्या मते काही ग्राहकांकडून या योजनेचा गैरफायदा करून घेतला जात आहे. याशिवाय अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वप्रकारे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अशा योजना राबवून काहीही उपयोग होणार नाही, असं बँकांचे मत आहे.सुप्रीम कोर्टाने रिझर्व्ह बँकेची कर्जहप्ते स्थगिती योजना डिसेंबरपर्यंत वाढविण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी १ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. सध्या करोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट पाहता रिझर्व्ह बँकेकडून समाप्त करण्यात येणाऱ्या मोरॅटोरियम योजनेची मुदत डिसेंबरपर्यंत वाढविण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.
Comments are closed