चौकशी होईल, निलंबन होईल पण पांडुरंग परत येईल का? उद्विग्न सवाल उपस्थित. 

 

पुणे, दि. २( punetoday9news):- पांडुरंग रायकर या पत्रकाराचा आरोग्य यंत्रणेच्या नियोजनाअभावी कोरोना ने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन ते अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अगेनपर्यंत सर्व महत्त्वाच्या घडामोडी पांडुरंग यांनी ‘टीव्ही ९’ च्या माध्यमातून मराठी माणसापर्यंत पोहोचवल्या.  मूळचे नगर जिल्ह्यातील असलेले पांडुरंग रायकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

ई टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही ९ मराठी असा पांडुरंग यांचा पत्रकारितेतील १५ वर्षांचा प्रवास. शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं. गेल्या तीन वर्षापासून ते टीव्ही ९ मराठीसोबत होते.

पांडुरंग यांच्या निधनाने पुणे पत्रकारिता क्षेत्रासह राजकीय, सामजिक क्षेत्र आणि विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाच्या संकटातही अविरतपणे काम करुन बातम्या देणाऱ्या पांडुरंग यांचीच बातमी होते, हा विचारच काळीज पिळवटून जातो. या कठीण काळात पांडुरंग यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी टीव्ही ९ मराठी परिवार खंबीरपणे उभा आहे.

पांडुरंग रायकर यांचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाला, असे सांगत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अजित पवारांनी विभागीय आयुक्तांकडे अहवाल मागितला आहे.

पांडुरंग रायकर यांचा जीव गेला, हे निश्चित दु:खदायक आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल. पुणे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना तसे सांगितल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

पुण्यात लक्ष दिलं जातं आहे, पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं आहे. ग्रामीण भागात‌ कोरोना पसरत‌ आहे, हे खरे असले, तरी बेड‌ कमी पडत‌ असतील तरी ते वाढवण्याचा‌ प्रयत्न केला‌ जात आहे. अँटिजन टेस्ट केल्या जातात त्या आयसीएमआरच्या गाईडलाईन्स आहेत, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

पांडुरंग रायकर यांच्या मृत्यू प्रकरणात चौकशी केली जात आहे. कोव्हिड काळात काम करताना कोणी दगावला तर त्याला मदत केली जाईल. ते जीव धोक्यात टाकून काम करत आहेत. विम्याची मदत मिळवून द्यायचा त्यांना प्रयत्न करु, असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले.

“पांडुरंगबाबत आम्ही सर्व जण पत्रकारांशी संपर्कात होतो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना बेड उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही सर्व प्रयत्न केले. रात्री बेड उपलब्ध झाला. मात्र, कार्डिअ‍ॅक रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. व्यवस्थेतील या त्रुटी पांडुरंग रायकर यांना आपल्यातून घेऊन गेल्या मी हे मान्य करतो,” असे महापौरांनी सांगितले.

व्यवस्थेतील ज्या काही त्रुटी दोष असतील, कोणतीही यंत्रणा असेल, महापालिका रुग्णालय किंवा राज्य शासनाने उभारलेले जम्बो हॉस्पिटल असेल ही जबाबदारी कोणी कोणावर न ढकलता ही स्वीकारली पाहिजे, असे महापौरांनी सांगितले.

पांडुरंग या चाळीशीतील उमद्या पत्रकाराचा असा मृत्यू होणं हे दुर्दैवी आहे, अंतर्मुख करायला लावणारा आहे, पत्रकाराची परिस्थिती अशी असेल ती योग्य नाही, याबाबत मी प्रशासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“माझा भाऊ यंत्रणेच्या असुविधेमुळे गेलाय, कोटीचा प्रोजेक्ट उभा केलाय, पण अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली नाही” अशी उद्विग्नता पांडुरंग रायकर यांच्या बहिणीने व्यक्त केली. घरचा डबा दादापर्यंत पोहोचलाच नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “रुग्णालयाने तुम्ही रुग्णाला घरचे जेवण देऊ शकता, असे सांगितले. दादाला भूक लागली होती, त्याने घरचा डबा आणायला सांगितला, मी काल रात्री आठ वाजता डबा दिला, पण शेवटपर्यंत तो त्याला मिळालाच नाही, दुपारी तीन वाजता दिलेली औषधंही मिळाली नाहीत. तो ना त्याला मिळाला, ना आमच्यापर्यंत रिटर्न पोहोचला. मी २०-२५ वेळा डॉक्टरांना विचारले” असेही पांडुरंग रायकर यांची बहीण म्हणाली.

 

 

 

Comments are closed

error: Content is protected !!