पुणे,दि.२( punetoday9news):- कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या पुणे शहराबरोबर ग्रामीण भागातही वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांवर वेळेत उपचार करुन मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील आळंदी आणि चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयाबरोबर म्हाळुंगे येथे उभारण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ‌. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, गटविकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, आरोग्य अधिकारी डॉ‌. दीपक मुंढे यांच्यासह डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस आशा वर्कर, अंगणवाडी सेविका सेवाभावी संस्था चांगले काम करीत आहेत. आपल्या सर्वांची साथ अशीच राहिल्यास कोरोना रुग्णांचा मृत्युदर शुन्यावर आणण्यास मदत होईल. कोरोनाबाधीत रुग्णांवर उपचार करतांना हलगर्जीपणा करु नका. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची कोविड रुग्ण असेल असे गृहीत धरुन कोरोना चाचणी करा, कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त होताच रुग्णांवर उपचार करा अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ‌. देशमुख यांनी यावेळी कोविड केंद्रात रुग्णांवर करीत असलेल्या उपचार पद्धती, रुग्णांकरीता करण्यात आलेल्या सोई-सुविधांची माहिती घेतली. याशिवाय जेवण, औषधोपचार, कोरोना चाचण्या यामध्ये अँटीजन चाचणी, आरटीपीसीआर चाचणी, स्राव पध्दती, ऑक्सिजन पुरवठा, पीपीई किट, रुग्णवाहिका, रुग्ण मृत्युदर, कोविड आणि नॉन कोविड रुग्ण, उपलब्ध मनुष्यबळ इत्यादी विषयांवर सूचना केल्या.

Comments are closed

error: Content is protected !!