पुणे दि.३ ( punetoday9news):- पुणे जिल्हयामध्ये कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणा-या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दौंड तालुक्याचा आज दौरा केला.

दौंड तालुक्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बाधितांचा वेळीच शोध घेवून त्यांचे अलगीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगतानाच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन केले पाहिजे. नियमभंग करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी आज यवत ग्रामीण रुग्णालय व दौंड नगरपरिषद क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी तसेच राज्य राखीव पोलीस मुख्यालयामध्ये दौंड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, गट विकास अधिकारी अमर माने, प्रभारी तहसिलदार एच.आर.म्हेत्रे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले की, अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींचा कोरोना विषाणू संसर्गापासून अधिक हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करुन अतिजोखमीचे आजार तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील बंधने पाळली जावीत, सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आदीचा अवलंब होत नसल्यास कारवाई करुन शिस्त निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देशही त्यांनी दिले, तसेच चेस दि व्हायरस या संकल्पनेप्रमाणे लक्षणे असणा-या व्यक्तींपर्यंत आरोग्य यंत्रणेने पोहचले पाहिजे, त्यामुळे संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल. हीच संकल्पना आपण संपूर्ण जिल्हाभर राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागात कोरोना संसर्ग
रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवा तसेच कोरोनाबाधित व्यक्तीचा संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या, अशा सूचना केल्या. यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते

Comments are closed

error: Content is protected !!