पुणे, दि.३( punetoday9news):- मौजे दौंडज व पिंपरे खुर्द येथे पालखी मार्गाकरिता संपादित होणाऱ्या जमिनीच्या नुकसान भरपाई वाटप करण्यासंदर्भात शिबीर घेऊन लागणाऱ्या कागद पत्राबाबत सविस्तर मार्गदर्शन उप जिल्हाधिकारी (भूसंपादन) सुनील गाढे व त्यांच्या पथकाकडून करण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून प्रशासनाचे आभार मानले आहे.
यावेळी गावातील नागरिकांच्या अनेक प्रश्नांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. काही शेतकऱ्यांच्या न्यायालयात केसेस सुरू असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले, त्याबाबत चर्चा करून त्याविषयी पुनर्विचार करून शक्य असल्यास नुकसान भरपाई स्वीकारण्याच्या मुद्द्याबाबत मर्यादित पक्षकारांची आपसात तडजोड करता येणे शक्य असल्यास त्या पर्यायाचा विचार करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच अजून काही ठिकाणी आजोबा मयत झाले असले तरी सात-बाराला मात्र अजून त्यांचीच नावे आहेत. पुढील वारसांची नावे लागलेली दिसत नाही, असे एक प्रकरण पिंपरे खुर्द येथे आढळल्याने याबाबत तातडीने दाखल घेऊन स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांना तातडीने आवश्यक त्या कार्यवाही करण्याच्या उपजिल्हाधिकारी गाढे यांनी सूचना दिल्या. या व्यतिरिक्त पुण्या- मुंबईत राहणारे खातेदार यांचे संमतीपत्र तसेच बँक खात्याचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले असून याबाबतची माहिती पुढील 8-10 दिवसात संबंधित खातेदार सादर करणार असल्याने नजीकच्या भविष्यात नुकसान भरपाई वाटपाचा वेग निश्चितपणे वाढलेला असेल यात शंका नाही. संपूर्ण पथक घेऊन गावातच शिबीर घेतल्यामुळे अनेक नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले. कोरोना संसर्गामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक पुण्यात येऊ शकत नसल्याने त्यांना कागदपत्राची पूर्तता पुण्यात येऊन समक्ष करता येत नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन आता उपजिल्हाधिकारी सुनील गाढे हे संपूर्ण प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा संपूर्ण फौजफाटा घेऊनच गावी जात आहे. तसेच कागदपत्र पूर्ण करून घेण्यासाठी मोबाईल व्हॅनसह (जागेवरच कागदपत्र तयार करण्यासाठी) गावी जाऊन नुकसान भरपाई वाटप करण्याचे प्रयत्न करत असल्याने संपूर्ण तालुक्यातून तसेच विविध स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होताना दिसत आहे.

Comments are closed

error: Content is protected !!