समाजमाध्यमांमध्ये प्रसारित होणारी रावेत येथील वीजपुरवठा खंडित होण्याची माहिती चुकीची महावितरणचे स्पष्टीकरण.
पिंपरी, दि. ५(punetoday9news) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रावेत अशुद्ध जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा महावितरणकडून सुरळीत आहे. मात्र, महापालिकेकडून या केंद्रातील अंतर्गत विद्युत विषयक दुरुस्ती कामासाठी गुरुवारी (दि. 3) सुमारे आठ तास वीजपुरवठा बंद ठेवण्यात आल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यासाठी महावितरण जबाबदार नाही अशी माहिती निशिकांत राऊत ,जनसंपर्क अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शनिवारी व रविवारी (दि. ४ व ५) पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून समाजमाध्यमांद्वारे प्रसारित होत आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, रावेत जलउपसा केंद्राचा वाढीव वीजभाराचे काम करण्यासाठी महानगरपालिकेकडून गुरुवारी (दि. ३) सकाळी १० वाजता विद्युत विषयक काम सुरु करण्यात आले व सायंकाळी ६.३० वाजता हे काम पूर्ण झाले होते . या कालावधीत महानगरपालिकेच्या मागणीनुसार महावितरणकडून जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता व या कालावधीत पंपींग बंद होते. त्यानंतर शुक्रवारी (दि. ४) रात्री ११ वाजता रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला होता. मात्र महावितरणने लगेचच तांत्रिक उपाययोजना करून ५० मिनिटांनी पर्यायी व्यवस्थेद्वारे या केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे.
हा ५० मिनिटांचा अपवाद वगळता महावितरणकडून रावेत जलउपसा केंद्राचा वीजपुरवठा सुरळीत असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासाठी महावितरण जबाबदार नसल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.
Comments are closed