पुणे,दि.६ (punetoday9news ) :- पुण्यातील बालेवाडी येथील ममता चौकात रविवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान मद्यधुंद अवस्थेत एका सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकाने भरधाव मोटार चालवून दुचाकीस्वाराला धडक देऊन पंक्चरच्या दुकानात घुसून ५ जणांना उडवले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे .

संतोष बन्सी राठोड (वय ३५, रा. काळेवाडी) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे तर राजेश सर्वेष सिंग (वय ३७, रा़ ताथवडे), यशवंत
भाऊसाहेब भांडवलकर (वय २९, रा़ रामनगर, माणिकबाग), दशरथ बबन माने (वय २७, रा. बालेवाडी ) व अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. चतु:श्रृंगी पोलिसांनी निवृत्त पोलीस निरीक्षक संजय वामनराव निकम (वय ५९, रा. बालेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संजय निकम हे पुणे शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते रविवारी दुपारी मंद्यधुंद अवस्थेत पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून वेगाने बालेवाडी येथील हायस्ट्रीट येथून जात होते. मद्यपानामुळे त्यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले व त्यांनी संतोष राठोड यांच्या दुचाकीला धडक दिली. मात्र दुचाकी मोटारीमध्ये अडकल्याने ते जवळपास १०० मीटर फरफटत गेले. त्यानंतरही मोटारीचा वेग कमी झाला नाही.

निकम यांच्या मोटारीने ममता चौकाच्या कडेला एका पंक्चरच्या दुकानाला धडक दिली. तेथे पंक्चर काढणारे व अन्य दोघे अशा तिघांना त्यांनी उडवले. त्यानंतर तेथे थांबलेल्या टेम्पोला धडक दिली. ही दुर्घटना पाहून नागरिकांनी त्यांना चांगलाच चोप दिला़ जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक समीर चव्हाण, उपनिरीक्षक मोहन जाधव, दत्ता शिंदे आणि पोलीस नाईक बानगुडे हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या तावडीतून निकम यांची सुटका करुन त्यांना ताब्यात घेतले.

Comments are closed

error: Content is protected !!