मुंबई, दि.७(punetoday9news):- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर सोशल मीडियातून निशाणा साधणाऱ्या कंगना रणौत विरोधात ५० कोटींच्या मानहानीचा दावा करण्यात आला आहे. जनमानसांत मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल प्रदीप लोणंदकर या एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने कंगनावर फौजदारी आणि दिवाणी असे दोन्ही दावे कोर्टात केले आहेत.

मुंबई पोलिसांविरोधात केलेली टिवटिव कंगनाला चांगलीच महागात पडू शकते. जनमानसांत असलेली मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल कंगनाने जाहीर माफी मागावी. तसेच या बेताल वक्तव्यांबाबद्दल तिने नुकसानभरपाई म्हणून ५० कोटी रूपये पोलीस वेलफेअर फंडमध्ये जमा करावेत. अशी मागणी करत प्रदीप लोणंदकर या निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांनी ज्येष्ठ वकील मोहन जयकर यांच्यामार्फत ही याचिका कोर्टात दाखल केली आहे.

सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असला तरी मुंबई पोलिसांच्या तपासावर कोर्टाने कोणतीही टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे कंगनाने स्वत:ला न्यायव्यवस्थे पेक्षा मोठे समजत मुंबई पोलिसांवर त्यांच्या आयुक्तांवर अशा पद्धतीने जहरी टीका करण्याचा काय अधिकार? असा सवालही या याचिकेतून करण्यात आला आहे.

कोरोना सारख्या महामारीचा मुकाबला करताना पोलीस स्वत:च्या जीवाची बाजी लाऊन लढत आहेत. कर्तव्य बजावत असताना अनेक पोलिसांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत . त्यामुळे सतत जनतेच्या सेवेसाठी झटणाऱ्या पोलिसांची अशाप्रकारे जनमानसांतली प्रतिमा मलिन होणे अत्यंत चुकीचे असल्याचे या याचिकेतून सांगण्यात आले आहे. सुशांत सिंह प्रकरणात कंगनानं बॉलिवूडमधील बडी नावे, महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष, शिवसेनेचे संजय राऊत या सर्वांच्या विरोधात समाजमाध्यमांवरून जाहीर टीका केली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत कंगनासमोरच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Comments are closed

error: Content is protected !!