लोणावळ्यातील कुमार रिसॉर्ट या नामांकित हॉटेलमध्ये जुगार खेळण्यासाठी आलेल्या तब्बल ७६ जणांना तीन पत्ती हा जुगार खेळताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लोणावळा शहरातील मध्यावर असलेल्या कुमार रिसॉर्ट या हॉटेलमध्ये तीन पत्ती या जुगाराच्या माध्यमातून लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी रिसॉर्टमधील दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगारावर छापा मारत ३ लाख २७ हजार रुपयाची रोकड तर जुगार खेळण्यासाठी वापरण्यात येणारे एक हजार रुपये किमतीचे ३७६० टोकन कॉइन तसेच पाचशे रुपये किमतीचे ८३० टोकन कॉइन असे एकूण ४१ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
हा “हाय प्रोफाईल” जुगार खेळण्यासाठी गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल,नेपाळ येथून आलेल्या ६२ पुरुषांसह १४ महिलांवर पोलिसांकडून महाराष्ट्र जुगार बंदी कायदा, रोग नियंत्रण कायदा ,दारूबंदी कायदा तसेच इतर कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.
पर्यटन नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यातील अवैध व्यवसाय करू पाहणाऱ्यांची पोलिसांकडून गय केली जाणार नसल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत. तसेच या हायप्रोफाईल जुगार अड्ड्य संदर्भात सखोल चौकशी करणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत कावत यांनी दिली आहे.
Comments are closed