पिंपरी, दि.८( punetoday9news):-
राज्यातील कला महाविद्यालय आणि इतर संस्थांच्या प्राध्यापकांना अरेरावी आणि शिवीगाळ केल्याचे प्रकरण राज्याचे प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांना चांगलेच भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मिश्रा यांच्या विरोधात कला महाविद्यालयांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. पुण्यातील आर्ट बिट फाउंडेशननेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत मिश्रा यांच्या हकालपट्टीची मागणी केल्याचे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पांचाळ यांनी सांगितले. यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अशाप्रकारे शिवीगाळ केल्याचे समोर आले, तर त्यांची उच्चस्तरीय संबधित अधिकार्‍यांकडून चौकशी करू, अशी माहिती दिली.
प्रभारी कलासंचालक राजीव मिश्रा यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभारामुळे राज्यातील कला महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कला संचालक कला क्षेत्रातील नसल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाला असून त्यांनी महाकॅटच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे, असा आरोप करीत महाराष्ट्र राज्य चित्रकला महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर संघ, (महाकॅटना), द फेडरेशन ऑफ आर्ट इन्स्टिट्यूशन आणि महाराष्ट्र राज्य कला महाविद्यालय संघ आदी संघटनांकडून राज्याचे प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांच्या हकालपट्टीची मागणी केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य चित्रकला महाविद्यालयीन शिक्षक शिक्षकेतर संघ, (महाकॅटना), द फेडरेशन ऑफ आर्ट इन्स्टिट्यूशन आणि महाराष्ट्र राज्य कला महाविद्यालय संघ आदी संघटनांनी राज्याचे प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. २३ ऑगस्ट रोजी प्राध्यापक संघटनेच्या एका प्रतिनिधीसोबत मिश्रा यांनी अर्वाच्य भाषेत बोलून त्यांना शिवीगाळ केल्याने प्राध्यापक संघटनांनी याविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. यासाठीची एक तक्रार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. तर राज्यभरात मिश्रा यांच्या हकालपट्टीसाठी प्राध्यापक संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरात काळ्या फिती लावून मिश्रा आणि एकूणच त्यांच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला जात आहे. कला आणि त्याची जाण, अभ्यास असलेल्या संचालकांना सरकारने नेमावे आणि आपल्या राज्याच्या कला परंपरेची जपणूक करावी, अशी मागणी संघटनांच्यावतीने करण्यात आली आहे.
कला संचालकांनी संघटनेचा अपमान केला आहे त्यामुळे सदर प्रकरणी विद्यमान प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी संघटनेची माफी मागून राजीनामा द्यावा, अशी संघटनेची आग्रही मागणी आहे. राजीव मिश्रा जोपर्यंत राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत कला महाविद्यालयातील कामकाज काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत केले जाईल, अशी संघटनांनी भूमिका घेतली आहे.
राज्यातील सर्व कला महाविद्यालयातील कर्मचाऱ्यानी या घटनेच्या विरोधात काळ्या फिती लावून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनांमध्ये ललित कला केंद्र, महाविद्यालयीन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत. कला महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून विद्यमान प्रभारी कलासंचालक राजीनामा देणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे.

Comments are closed

error: Content is protected !!