मुंबई, दि.९ (Punetoday9news):- कोरोना महामारिच्या काळात राज्याने मोठ्या हिमतीने या संकटाशी सामना करून इतर राज्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. आज देशभरात कोरोना चाचणी करण्यासाठी ४ हजार ५०० रुपये इतका खर्च येतो. मात्र महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे ही चाचणी खासगी प्रयोगशाळेत केवळ १२०० रुपयांमध्ये करण्यात येत आहे.

तसेच आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत दिली.

आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विविध विभागांच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आल्या. यावेळी विधानपरीषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व सदस्यांनी राज्यातील कोविड-१९ परिस्थितीबाबत राज्य शासनाने केलेल्या उपाययोजना याबाबत मुद्दा उपस्थित केला होता. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्या संदर्भात उत्तर देताना त्यांनी राज्यातील कोविड-१९ परिस्थितीबाबतची स्थिती नमूद केली.

राज्यात कोविड-१९ बाबतच्या सर्वाधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या काळात आरटीपीसीआर आणि अण्टीजन चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बेड उपलब्ध करून देणे, चाचण्यांचे दर, ऑक्सिजनची उपलब्धता, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देणे आदी निर्णय सामान्य माणूस केंद्रबिंदु मानून घेतले आहेत. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी जाहीर करताना पारदर्शकता ठेवण्यात आली असून त्याचबरोबर कोरोना योध्यांना विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments are closed

error: Content is protected !!