मुंबई, दि. ९(punetoday9news):-  कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर अखेर हातोडा पडला आहे. पाली हिल येथे असलेल्या कार्यालयातील बेकायदा बांधकामावर मुंबई महापालिकेने कारवाई सुरू केली आहे.

मुंबई व मुंबई पोलिसांविरुद्ध वक्तव्य केल्यामुळे कंगना शिवसेनेच्या रडारवर आली होती. मुंबईत भीती वाटत असेल तर स्वत:च्या राज्यात निघून जाण्याचा सल्ला शिवसेनेने कंगनाला दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून कंगनाने शिवसेनेलाच आव्हान देत डिवचले होते . या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिकेच्या वांद्रे पश्चिम येथील एच-पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागाच्या पथकाने कंगनाच्या बंगल्याची पाहणी केली होती. त्यात काही बांधकाम सुरू असल्याचे आढळले. त्यानंतर पालिकेने मंगळवारी प्रशासकीय परवानगीची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस पाठवली होती. पालिकेचे अधिकारी नोटीस बजावण्यासाठी गेले असता तेथे हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी नोटिस स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पालिकेने कार्यालयावर नोटीस चिकटवली.

कंगनाचा बंगला निवासी असल्याने त्यात कार्यालय सुरू करण्यासाठी रीतसर परवानगी घेणे गरजेचे होते. पालिका अधिनियम ३५४ (अ) अंतर्गत कोणत्याही निवासी जागेचा व्यावसायिक वापर करता येत नाही. बंगल्यामध्ये चटईक्षेत्र नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून एकूण १४ ठिकाणी नियमबाह्य बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय काही अंतर्गत बदलही करण्यात आले आहेत. यात शौचालय तोडून त्या जागी कार्यालय बांधण्यात आले आहे. त्यासाठी परवनागीही घेण्यात आलेली नाही, असे नोटिशीत म्हटले आले. याबाबत उत्तर देण्यास कंगनाला २४ तासांची नोटिस देण्यात आली होती. कंगनाच्या वतीने कारवाई पुढे ढकलण्याची विनंती महापालिकेला करण्यात आली होती. मात्र, महापालिकेने त्यास नकार दिला. त्यानंतर आज कारवाई करण्यात आली.

Comments are closed

error: Content is protected !!