दिल्ली, दि. १०(punetoday9news):- भारत व चीन यांच्यात पूर्व लडाखमधील सीमेवर गेले काही आठवडे सातत्याने तणाव असतानाच, भारत व चीनचे लष्कर परस्परांपासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या सीमावर्ती ठाण्यांवर आमनेसामने उभे ठाकण्याची परिस्थिती बुधवारी उद्भवली. त्यामुळे एकीकडे राजनैतिक तसेच लष्करी पातळीवर चर्चा सुरू असतानाही, दुसरीकडे पूर्व लडाखमधील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसल्याचे समोर आले.
संबंधित घडामोडींची माहिती असलेल्या दिल्लीतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत व चीन या दोन्ही देशांचा दावा असलेल्या पँगाँग त्सो तलावाच्या दक्षिणेला किमान चार ठिकाणी दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर आले होते. दोन्ही बाजूंचे जवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आतल्या बाजूला होते. मात्र परिस्थिती तणावपूर्ण आहे. दिल्लीतील अन्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रेझांग ला खिंडीजवळील भागात दोन्ही देशांचे सैनिक परस्परांपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर उभे ठाकले होते.
Comments are closed