पुणे, दि. १०(punetoday9news):-  महाराष्ट्रात गुटखा विक्रीला बंदी असतानाही वारंवार अवैधरित्या शहरातील सर्वत्र गुटखा पोहोचतो कसा? हा प्रश्न वारंवार समोर येत आहे. पुण्यातील हडपसर मध्ये एका व्यापाऱ्याला गुन्हे शाखेने अवैधरित्या गुटखा विक्री आरोपात अटक केली आहे . त्याच्याकडून ८४ हजारांचा आरएमडी, विमल, तुलसी व्हिवन गुटखा जप्त करण्यात आला. बिंजाराम उर्फ विजय गणेश देवासी (वय २४ रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊन काळात सर्व तंबाखू जन्य पदार्थ विक्रीस कडेकोट बंदी होती. पण लॉकडाऊन शिथिल होतास बंदी असणारा गुटखा तेजीत सुरू झाला आहे. दरम्यान गुन्हे शाखेला त्यावर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी देवासी हा अवैधरित्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली.देवासी अवैधरित्या विक्री करत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यात आरोपीकडून ८३ हजार ९८२ रुपये किंमतीचा विमल गुटखा, तुलसी, व्हिवन, आरएमडी व इतर तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. देवासी याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात अवैध गुटखा विक्री प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले त्यांनी आरोपीला १० सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गुन्हे शाखा पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंह, सहायक
पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट – एक गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी सचिन जाधव, संजय बरकडे, प्रशांत गायकवाड, बंडू शिंदे, सतीश वणवे याांनी ही कारवाई केली.

Comments are closed

error: Content is protected !!