ऑक्स्फर्ड,दि.१२ (punetoday9news):- स्वदेशी बनावटीच्या कोव्हॅक्सीन लशीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी ठरलेली असताना आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकाने करोना लशीच्या चाचण्या पुन्हा सुरु केल्या असल्याची माहिती मिळाली आहे. ब्रिटनमध्ये मानवी चाचणीत ऑक्सफर्डच्या लशीचा डोस दिल्यानंतर एक व्यक्ती आजारी पडला होता. त्यामुळे अस्त्राझेनेकाने या चाचण्या जगभरात स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. लशीचा डोस दिल्यानंतर या व्यक्तीवर दुष्परिणाम कसे झाले? त्याचा तज्ज्ञांच्या स्वतंत्र पथकांकडून तपास सुरु झाला होता.आता यूकेमधल्या आरोग्य नियंत्रकांनी (MHRA) ने पुन्हा ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या सुरु करण्याची परवानगी दिली असल्याचे वृत्त आहे.

 

अस्त्राझेनेका ऑक्सफर्डने विकसित केलेल्या AZD1222 लशीचे उत्पादन करणार आहे.जगभरात आतापर्यंत १८ हजार स्वयंसेवकांना या लशीचा डोस देण्यात आला आहे. चाचणी दरम्यान एक व्यक्ती आजारी पडल्यामुळे चाचणी स्थगित करण्यात आली होती. “मोठया प्रमाणावर जेव्हा चाचणी होते, तेव्हा काही जण आजारी पडतात. लशीचा डोस घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे मूल्यमापन आवश्यक आहे” असे ऑक्सफर्ड विद्यापीठाने स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे. कुठला स्वयंसेवक आजारी पडला त्याचे नाव ऑक्सफर्डने जाहीर केलेले नाही.संपूर्ण जगाला ऑक्सफर्डच्या या AZD1222 लसीकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. चाचणीच्या अंतिम टप्प्यात असल्यामुळे ही लस लवकर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगाचे लक्ष या लसीकडे लागले आहे.

 

Comments are closed

error: Content is protected !!