मुंबई, दि. १४( punetoday9news):-
शून्य ते सहा वयोगटातील बालकांमधील दिव्यांगत्व वेळीच ओळखून त्यावर योग्य उपचार केल्यास त्या बालकास कायमचे दिव्यांग होण्यापासून रोखणे शक्य आहे. यासाठी राज्यातील दिव्यांगांच्या सर्व विशेष शाळांमध्ये ‘शीघ्र निदान, शीघ्र उपचार’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य तसेच अली यावर जंग राष्ट्रीय मूक बधिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यातील सर्व विशेष शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना ‘शीघ्र निदान व शीघ्र उपचार’ या उपक्रमाचे ५ दिवसीय प्रशिक्षण वेबिनारद्वारे देण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले.
मुंडे म्हणाले, राज्यातील बालकांमधील दिव्यांगत्वाचे प्रमाण व निश्चित संख्या जाणून घेण्यासाठी त्याचे सर्वेक्षण व ऑडिट करणे गरजेचे आहे. सामाजिक न्याय विभागाचे उद्दिष्ट दिव्यांगांना केवळ सेवा शुश्रूषा आणि सहानुभूती देणे नसून त्यांना उपजीविकेसाठी सामान्य व्यक्तिप्रमाणे सक्षम करणे हे आहे.
लहान बालकांमधील जन्मापासून कमी अधिक प्रमाणात आलेल्या व्यंगत्वाला वेळीच निदान करून त्यावर योग्य उपचार केल्यास ते रोखणे किंवा त्याची तीव्रता व प्रमाण कमी करणे शक्य आहे असेही यावेळी मुंडे म्हणाले.
सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवनातील प्रत्येक संधी विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी राज्यातील सर्व दिव्यांग विशेष शाळांमध्ये उपचार केंद्र सुरू करत असून, यासाठी संबंधित शिक्षक, भौतिक उपचार तज्ञ आदींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आधुनिक उपचार पद्धती, यंत्रसामग्री यांचा वापर करून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन शिक्षकांनी संपूर्ण क्षमतेने त्यांचे योगदान दिल्याने लहान मुलांमधील अल्प व मध्यम स्वरूपाचे व्यंगत्व कमी करणे किंवा त्याची तीव्रता कमी करणे निश्चितच शक्य आहे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
पालकानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वात जवळ शिक्षक असतात त्यामुळे त्यांनी चौकटीबाहेर पडत आपले योगदान द्यावे, दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य मुलांप्रमाणे सामान्य शाळेत ज्या दिवशी शिक्षण घेता येईल त्यादिवशी खऱ्या अर्थाने या उपक्रमाचे उद्दिष्ट साध्य होईल. केवळ सुविधा देणे नाही, तर उपचार करून सुधारणा करणारा विभाग म्हणून सामाजिक न्याय विभागाची वेगळी ओळख निर्माण करण्याचा मानस असून यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र रुग्णलाय भविष्यात स्थापण्याचाही मानस असल्याचे यावेळी सांगितले.
पाच दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करून मुंडे यांनी यामध्ये सहभागी सर्व अधिकारी, शिक्षक व अन्य सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या उपसचिव श्रीमती तारिका रॉय, राज्य सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, दिव्यांग कल्याण आयुक्त श्रीमती प्रेरणा देशभ्रतार यांनीही विचार व्यक्त केले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या उपसचिव तारिका रॉय, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, अली यावर जंग संस्थेच्या संचालिका डॉ. सुनी मॅथ्यू यासह प्रमुख अधिकारी, राज्यभरातील विशेष शिक्षक व कर्मचारी वेबिनारद्वारे उपस्थित होते.
Comments are closed