भ्रमंती

(Punetoday9news):- किल्ला तर दुरच ज्याच्या पायऱ्या पाहुनच अरे बापरे…! म्हणत रोमांच उभा राहतो असा हा हरीहर गड. कितीतरी वेळ नुसत पायऱ्यांकडेच एकटक बघत रहावस वाटत.    साधारण 80 च्या कोणात थेट आकाशात घुसलेली वाट..!  एकावेळी फक्त एकालाच चढता उतरता येईल अशी कातळ पायर्‍यांची रचना, चढतांना पायऱ्यांच्या दोन्ही बाजुला असलेल्या खोबणींचा आधार घेत वर चढत जायचे, पुढच्याने घसरू नये हि प्रार्थना करत.! 
          नाशीक जिल्हयातील त्र्यंबक रांगेमधील हरीहर हा प्रमुख किल्ला समुद्र सपाटीपासून ११२० मिटर उंचीवर आहे  हरीहर गडाची खरी ओळख म्हणजे कातळात कोरलेल्या पायर्‍या. कातळात पायर्‍या कोरण्याची पध्दत सातवाहन काळापासुन बघायला मिळते पण कालौघात बर्‍याच ठिकाणी नष्ठ झाल्याचेही दिसून येते. हरीहरचेही तेच झाले असते पण काळाला ते मंजुर नव्हते
        तो हुआ ऐसा …. १८१८साली इंग्रजांनी मराठेशाही बुडवण्याची धडक मोहीम हाती घेतली आणी हरिहर गडाचे टेंडर मिळाले कॅप्टन ब्रीग्ज या इंग्रज अधिकार्‍याला मग काय भाऊ आले बम गोले घेऊन, पाहता पाहता किल्ला घेतला जिंकून ! त्यावेळी गड दुर्गाच्या वाटा , प्रवेश मार्ग तोफ डागून उध्वस्त करण्याचे धोरण होते. आता ठरल्याप्रमाणे गडाच्या पायर्‍या उध्वस्त करायच्या होत्या पण कातळात कोरलेल्या अप्रतीम पायर्‍यांनी कॅप्टन ब्रीग्ज वर मोहीनी घातली, भाऊच मन भरुन आल आणी भाऊने आदेश दिला ” खबरदार.! कुणी पायर्‍या तोडल्यातर, पायऱ्यांना हात लावायचा नाही, नाहीतर पायकट शेकीन ”  thanku ब्रीग्जभौ तुम्ही पायर्‍या तोडल्या असत्या तर आम्हाला  घरून शिडी आणा लागली असती ! गमतीचा भाग वेगळा पण खरच आज हा ऐतिहासिक ठेवा कायम आहे त्यात कॅप्टन ब्रीग्ज चा पण वाटा आहे.
       दम लगाके हैया.! म्हणत एकदा वर पोहचलो की दोन बुरुजांच्या मध्ये असणारा मुख्य दरवाजा आपल्याला आत येण्याचे निमंत्रण देतो इथुन खाली बघितले कि एक विचार नक्कीच येतो चढ तो गये अब उतरेंगे कैसे.! पण क्षणभरच, कारण इथुन पुढे जाणारी वाट होश उडा देने वालीच आहे दगडी कातळामद्ये कोरलेला अर्ध वर्तुळाकार भुयारी मार्ग आपल्याला म्हणतो आगे बढो..!  या मार्गावर चालतांना डाव्या बाजूची खोल दरी बघुन एकाचवेळी थरकाप आणी रोमांच अनुभवता येतो खर तर हा थ्रील शब्दात मांडणे कठिणच. पुढे एकामागून एक अनुभवायला मिळते कुठे भुयार तर कुठे खडकात कोरलेल्या नागमोडी वळण घेणार्‍या पायर्‍या तर कातळात कोरलेली सपाट वाट… !
       गडाच्या मुख्य पठारावर पोहचल्यावर दोन्ही हात वर करून हर हर महादेव चा केलेला गजर आजही आठवतो पठारावर बांधकामाचे फार तर अवशेष तेवढे दिसतात.पुढे गेल्यावर एक तलाव लागतो तलावाच्या काठावर  हनुमान मंदिर आणि शीवलींग व नंदी दिसते.पठारावर कातळात कोरलेली पाच पाण्याची टाके आहेत आणी बाजुलाच दारुगोळा ठेवायचे कोठार! हि इमारत मात्र एकदम सुस्थितीत आहे. पण गडावर भेट देणार्‍या काहि कलाकार मंडळींनी एक दिल त्यात उभा बाण आणी दोन नाव टाकून फक्त भारतातच आढळून येणारा हा चीत्रकलेचा अप्रतीम नमुना इथे सुध्दा जागोजागी रेखाटल्याचे बघुन आपले मन नक्कीच अभीमानाने भरून येते. आम्ही सुध्दा हि अप्रतिम कलाकृती याच देहि याचि डोळा बघुन पुढे नीघालो गडावरील सर्वात उंच टेकडीवर! हव तर बालेकिल्लाच म्हणा इथे मात्र वर चढायला कस लागतो एकदम भारी थ्रिलिंग..! वर पोहचल्यावर डौलाने फडकत असलेला भगवा झेंडा बघुन उर अभिमानाने भरून येतो बालेकिल्यावरून दिसणारा नागफनाडोंगर तर लयच भारी.! तसेच भास्करगड वैतरणा धरण, त्र्यंबकगड व इतरही गड फारच आकर्षक दिसतात.
      साधारण त्रिकोणी आकाराचे हे पठार दोन तासात बघुन  आता वेळ होती परतीची. पाऊलं उचलल्या जात होती पण मन मात्र तयार होईना.  खर तर गड बर्‍यापैकी बघीतलेत पण हरीहर गड मात्र कायमच लक्षात राहील, जागोजागी आश्चर्य वाटायला लावणारा हा गड सर्वांनी एकदा तरी बघावाच. अर्थात लाँकडाऊन संपल्यावर..! कोरोना गेल्यावर…!!
  कसे जाल – हरीहर गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत
नाशिक किंवा इगतपुरी वरुन त्र्यंबकेश्वर मार्गे नीरगुडपाडा हे गाव लागते , गावातुन गडाकडे जाता येते. गडावर जाण्यासाठी साधारण दोन तास लागतात तर हर्षेवाडी गावातुन एक तास लागतो.तुलनेने हि वाट सोपी आहे.
  गडावर १० जण आरामात राहू शकतील अशी सुस्थितीत असणारी एक इमारत तेवढी आहे.तसेच गडावर बारमाही पुरतील असे पाण्याचे टाके आहेत पण तरीही पुरेसे पाणी आणि जेवण सोबत घेऊन जावे.
(*गिर्यारोहण, सायकलिंग, अविस्मरणीय प्रवास अनुभव आपण punetoday9news ऑनलाईन न्यूज तर्फे वाचकांपर्यत पोहचवून इतरांना प्रेरणा देऊ शकता. त्यासाठी punetoday9news@gmail.com किंवा WhatsApp 8625867929 वर आपण माहिती पाठवू शकता.)

Comments are closed

error: Content is protected !!