मराठा आरक्षणाला स्थगिती असताना पोलीस भरतीची घाई म्हणजे मराठा समाजाला एकटे पाडण्याचा कुटील डाव नाही ना, अशी शंका खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.
कोल्हापूर,दि १७ ( punetoday9news):- मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकर भरती केली जाऊ नये अशी मागणी असतानाही पोलिस भरती आदेश निघाल्यामुळे मराठा समाजात तीव्र संताप आहे असे मत भाजपचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.
‘विरोध होणार हे माहीत असताना पोलीस भरतीचे आदेश काढणे पूर्णपणे चुकीचे आहे. मराठा समाजाला एकटे पाडण्याचा हा कुटील डाव तर नाही ना,’ अशी शंका संभाजीराजे यांनी उपस्थित केली आहे.
संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संदर्भात पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.
‘मराठा आरक्षण प्रकरण अंतिम निर्णयासाठी मोठ्या खंडपीठाकडे सोपवताना सध्याच्या आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे तीव्र पडसाद सध्या राज्यभरात उमटत आहेत.
‘मराठा समाज हा इतरांचे हक्क हिरावून घेऊ इच्छित नाही. त्यांना त्यांचा हक्क हवा आहे आणि या लढ्यात सर्व जातीसमूह मराठा समाजाच्या सोबत आहेत. मोठा भाऊ अडचणीत असल्यामुळे सर्व बहुजन समाज हा लहान भावाप्रमाणे मराठा समाजाच्या सोबत होता, आहे आणि राहणार,’ असेही संभाजीराजे भोसले यांनी म्हटले आहे.
Comments are closed