दिल्ली, दि.१८ ( punetoday9news):- पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाला यावर्षीचा सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी आज प्रदान केला.

विश्वकर्मा जयंती दिनानिमित्त भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (एआयसीटीई) च्यावतीने दुसऱ्या ‘विश्वकर्मा’ पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन दूरदृश्यप्रणालीच्या व्दारे करण्यात आले. एआयसीटीई अंतर्गत असणाऱ्या देशातील विविध संस्थांना १४ श्रेणींमध्ये ३४ संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. एआयसीटीई मान्यताप्राप्त संस्थांना विशिष्ट क्षेत्रात त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी प्रोत्साहित करणे, मान्यता देण्यासाठी या पुरस्काराने गौरविण्यात येते. यामुळे समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते.

यावेळी पोखरियाल म्हणाले, भारतात कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता महामारीपासून नागरिकांचे संरक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण आव्हान सध्या देशासमोर आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी तांत्रिक संस्था संशोधनाव्दारे मदत करीत आहेत.  त्यामुळेच विश्वकर्मा पुरस्कार २०२० या वर्षाची संकल्पना ‘इंडिया फाइट्स’ कोरोना अशी ठेवली आहे.

संपूर्ण १४ श्रेणींतील सर्वोत्कृष्ट कार्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणेला सन्मानित  करण्यात आले. यासह या महाविद्यालयाला  दुसऱ्या श्रेणीतील दुसरा पुरस्कारही प्राप्त झाला. दुसऱ्या श्रेणीतील तिसरा पुरस्कार पुण्यातीलच डॉ. डी.वाय.पाटील, औषध विज्ञान आणि संशोधन संस्थेला प्रदान करण्यात आला. सहाव्या श्रेणीतील दुसरा पुरस्कार औरंगाबादमधील महात्मा गांधी मिशन, जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी विद्यालयाला प्रदान करण्यात आला.   नवव्या आणि अकराव्या श्रेणीतील क्रमश: दुसरा आणि तिसरा पुरस्कार पुण्यातील विश्वकर्मा तांत्रिक संस्थेने पटकावला आहे.  असे एकूण ८ पुरस्कार महाराष्ट्राने पटकाविले आहे.

Comments are closed

error: Content is protected !!