मुंबई, दि. १९ (punetoday9news):- मुंबई व ठाणे शिधावाटप यंत्रणेतील अधिकृत शिधावाटप दुकानांतून सर्वसाधारण दर्जाचे अन्नधान्य वितरित करण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. असे असताना सुद्धा काही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाच्या अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी काही स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत असल्याची दखल अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेऊन यासंदर्भात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्या अनुषंगाने दक्षता पथकामार्फत मुंबईतील दुकानांची अन्नधान्याच्या दर्जाबाबतची तसेच इतर बाबींची संपूर्ण तपासणी केली असता आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात जीवनावश्यक वस्तु कायदा, 1955 अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
याद्वारे सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, कोणीही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाचे अन्न वितरीत करण्याचा प्रयत्न करीत असल्यास कार्यालयाच्या हेल्पलाईन क्र. 022-22852814 तसेच ई-मेल आयडी dycor.ho-mum@gov.in यावर संपर्क साधावा जेणेकरुन अशा अधिकृत शिधावाटप दुकानदारांविरुद्ध कारवाई करणे शक्य होईल. असे नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Comments are closed