भ्रमंती विशेष.
तुंग( कठीणगड) किल्ला.
पुणे, दि.२१(punetoday9news):- पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथून प्रवासाला सुरुवात केली कोरोणामुळे तब्बल पाच महिने गिर्यारोहणास मिळालेल्या विश्रांती नंतर तुंग किल्ल्यावर चढाईचा निश्चय करण्यात आला.
त्यानुसार मी (सागर झगडे) नितीन नवले व गणेश भोसले असे तिघे मिळून निघालो . आतापर्यंत जवळपास २० किल्ल्यांच्या भ्रमंतीचा अनुभव सोबत असला तरी प्रत्येक किल्ला हा नाविन्यपूर्ण अनुभव देत असतो हे माझे मत आहे. या किल्या शेजारील लोहगड तिकोना गडावर गेल्यानंतर नेहमीच या गडाचे आकर्षण व्हायचे आज या गडाची भ्रमंती होणार या विचाराने एक विलक्षण उत्साह मनामध्ये निर्माण झाला होता.
सकाळी साडेअकराच्या सुमारास आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलो. जाताना खड्डेमय रस्त्याने थोडीशी निराशा झाली मात्र गडाच्या पायथ्याशी पोहोचतात समोर दिसणारा विशालमय असा गड पाहून सारी थकावट दूर झाली. बारा वाजण्याच्या सुमारास गडाच्या चढाईला सुरुवात केली. गडाला तशा कोरीव पायऱ्या कमीच. व पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने त्याही सर्वच वाहून गेलेल्या त्यामुळे शिल्लक असलेली पायवाट ही दगडातून काढत वर जायचे. गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या युवकांसाठी मात्र ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. गडावर जाण्यासाठी दोन दगडांच्या कपारीतून डोंगराच्या एका कडेवरून जाणारी ही पायवाट चढत आम्ही एक तासाच्या आत वर पोहोचलो. जाताना हनुमान मंदिर, डोंगरांमध्ये कोरलेले टाके पहायला मिळतात. गडाचे मुख्य प्रवेशद्वार पार करताच उजव्या बाजूला गणेश मंदिर आहे. गवत वाढले असल्या कारणाने ते तिथे गेल्यानंतरच दिसते. या मंदिरा शेजारीच सुंदर अशी पाण्याने भरलेली बारव आहे यामध्ये पाहता बालेकिल्ल्याचे सुंदर प्रतिबिंब यात प्रतिबिंबित होते.
गडावर इतर किल्ल्याप्रमाणे मोठा पसरट भाग नसल्याने कमी वेळेमध्ये हा संपूर्ण गड पाहून होतो. जवळपास समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंच हा किल्ला आहे. किल्ल्यावर चढताना कित्येक विविध प्रकारच्या वनस्पती, फुले पाहायला मिळतात. मात्र प्रत्येक ठिकाणी चालताना काळजीपूर्वक पाऊल टाकणे गरजेचे आहे कारण बहुतांशी भागात पाऊलवाट अत्यंत अरुंद असल्याने तसेच कडेला गवत वाढले असल्याने थोडे पाऊल चुकले तरी खोल दरीमध्ये पडण्याची भीती आहे अशा घटना घडल्याची माहिती ही स्थानिक लोकांकडून ऐकायला मिळतात.
बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर तुंगाई देवीचे मंदिर आहे या मंदीराच्या कडेला प्रदक्षिणेसाठी छोटीशी पायवाट आहे इथेही जपून चालणे आवश्यक आहे मात्र तिथे पोहोचल्यानंतर दूरपर्यंत सह्याद्री रांगा दिसतात ते पाहणे एक विलक्षण अनुभव आहे. निसर्गाच्या कुशीत असलेली शेतातील घरे, भात शेती, चरणारी मुंगी एवढी गुरे वरून दिसतात त्यातच कुठेतरी कोंबड्यांचा आवाज सुद्धा वरपर्यंत ऐकायला येतो हे विशेष . काळानुरूप तिकडेही बऱ्याच ठिकाणी सिमेंटच्या जंगलांचे अतिक्रमण झाले आहे मात्र गडापर्यंत पोहोचलेले नाही.
तुंगाई बालेकिल्ल्यावर देवीच्या मंदिरासमोर थोडासा भाग सपाटीचा आहे मात्र या ठिकाणी जवसाच्या फुलाप्रमाणे फुले पिवळी फुले फुलली होती त्यावर पंख असलेल्या लाल मुंग्याचे साम्राज्य होते जणू हे येणाऱ्या पर्यटकांना व गिरी प्रेमींना तिथे न थांबण्याची सूचना देत होते त्यातही ही सूचना कोणी दुर्लक्षित केलीच तर त्यावर हल्ला चढवून जोरदार चावा घेत होते त्यामुळे तिथे कुणीही जास्त वेळ थांबण्याचे धाडस केले नाही आम्हीही आमच्या डोळ्यांचा कॅमेरा व प्रत्यक्ष कॅमेरात काही नयनरम्य दृश्य टिपली व बालेकिल्ल्यावरून खाली उतरलो त्यानंतर गणेश मंदिराच्या समोर गवतामध्ये मध्ये बसून पवना धरणाचा विस्तीर्ण भाग व पसरलेले निसर्ग सौंदर्य न्याहाळत बसलो त्यानंतर पावसाच्या आगमनाची पूर्वसूचना देण्यासाठी जणू हळूहळू धुकं दाटू लागले त्यात हा गड उतरताना पायवाट धोक्याची असल्याने पाऊस पडला तर उतरताना अडचणीचा सामना करावा लागेल या विचाराने सर्वच आलेले गिरिप्रेमी परतीच्या वाटेला लागले. हळूहळू बालेकिल्ला, गणेश मंदिरा समोरील आजूबाजूचा भाग धुक्यामध्ये पूर्ण गायब होऊ लागला आम्ही गडाला अलविदा करत परतीचा मार्ग सुरु केला व संपूर्ण किल्ला तीन तासाच्या आत सर झाला. या विलोभनीय दृश्याला आठवत गाडी निघाली. येताना खड्डेमय रस्ते असल्याने परतीचा मार्ग बदलून लोणावळा ॲम्बी व्हॅली मार्ग स्वीकारत निघालो. हळूहळू जवळ संपुर्ण मार्गावर दाट धुके पसरल्याने एक विलक्षण अत्यंत नयनरम्य सुंदर असा नजरा निर्माण झाला होता. अशी ही एक वेगळी दुर्गभ्रमंती भ्रमंतीच्या अनुभवात आनंद द्विगुणीत करणारी होती.
गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.
१. पवनानगर, पिरंगुट वरून जवण मार्गे तुंग.
२. लोणावळा ॲम्बीव्हॅली मार्गे.
सद्यस्थितीत लोणावळा मार्ग हा प्रवासाच्या दृष्टीने उत्तम आहे.
( तुम्हीही तुमची दुर्गभ्रमंती, सायकलिंग, प्रवास याची प्रेरणादायी माहिती punetoday9news मार्फत वाचकांपर्यत पोहचवू शकता.
त्यासाठी WhatsApp 8625867929, punetoday9news@gmail.com वर माहिती पाठवू शकता. यासाठी कसल्याही प्रकारची फी आकारली जात नाही.)
Comments are closed