ई पीक ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होवून मालाला योग्य भाव 

 

मुंबई, दि. २२( punetoday9news):-  ई-पिक पाहणी मोबाईल ॲपबाबत महत्त्वाची बैठक झाली. या ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव आणि चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे  त्यामुळे हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरेल. यासाठी येणाऱ्या काळात राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले , “आज कृषी विभागाने विकेल ते पिकेल ही योजना आणली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना चांगली बाजारपेठ, मालाला योग्य भाव मिळवून देणे यावर भर देण्यात येत आहे. याचनुसार या मोबाईल ॲपमुळे शेतकरी वर्ग संघटित होणे आवश्यक आहे. ई-पिक पाहणी मोबाईल ॲपमध्ये केवळ शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे हे लक्ष्य नाही. शेतकऱ्यांनी कोणतं पीक घेणे आवश्यक आहे, कोणते पीक कोणत्या विभागात घेतले जाणे आवश्यक आहे, कोणत्या पीकाला चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे, पिकाला योग्य भाव कसा मिळेल याची माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे.”

“ई- पिक पाहणी संदर्भात मोबाईल ॲप विकसित करताना यामध्ये कोणत्याही उणीवा राहू नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या मोबाईल ॲपचा उपयोग शेतकऱ्यांनाच होणार असल्याने त्यांच्यासाठी हे किती महत्वाचे आहे हे त्यांना समजावून सांगणे महत्वाचे आहे. वस्तुस्थिती दर्शक, सद्यस्थिती दर्शक संकलित करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. या ॲपमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पध्दतीने माहिती, इमेजेस अपलोड करण्याची सोय देण्यात आली ही अत्यंत चांगली बाब आहे,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

Comments are closed

error: Content is protected !!