चीन,दि.22( punetoday9news):- चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूनं सध्या थैमान घातलं असतानाच, चीनमध्येच नव्या संसर्गानं लोक आजारी पडत आहेत. ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाचा हा संसर्ग आहे.

चीनच्या उत्तर-पश्चिम भागातील गॅन्सू प्रांतातील लानजोऊ शहरात या ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाचा संसर्ग दिसून येतोय. शेकडो लोक या बॅक्टेरियामुळे आजार पडले आहेत.

चीनचं सरकारी वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनं गॅन्सू प्रांताच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल विभागाच्या माहितीचा दाखल देत म्हटलंय की, ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाची आतापर्यंत जवळपास 3 हजार 245 लोकांना लागण झालीय.

गेल्या सोमवारी म्हणजे 14 सप्टेंबर रोजी 21 हजार लोकांची चाचणी करण्यात आली. त्यात 4 हजार 646 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र, ही संख्या आणखी जास्त असू शकते, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रशासन आणि सर्वसामान्य लोकांमध्ये या आजाराची भीती दिसून येत आहे.

ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाच्या पार्श्वभूमीवर 11 सरकारी संस्थांना मोफत चाचण्या आणि उपचारासाठी हॉस्पिटलचा दर्जा देण्यात आला आहे, अशीही माहिती ग्लोबल टाइम्सनं दिलीय.

ब्रुसेलोसिस हा बॅक्टेरिया आहे. गाय, मेंढी, शेळ्या, डुक्कर आणि कुत्र्यांना याची मुख्यत: लागण होते. हा आजार झालेल्या प्राण्यांच्या सहवासात आलेल्या माणसांनाही हा आजार होण्याची शक्यता असते.

एखाद्या प्राण्याला हा आजार असेल, तर त्या प्राण्याच्या खाण्या-पिण्याच्या जागेत माणसाने श्वास घेतल्यास त्याच्या शरीरात ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाचा प्रवेश होऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाग्रस्त प्राण्यांचं दूध किंवा त्यापासून बनवलेल्या पनीरमधून माणसांना त्याची लागण होऊ शकते. पण एका माणसातून दुसऱ्या माणसात होणाऱ्या संसर्गाचं प्रमाण खूप कमी आहे.

जगातील अनेक देशांमध्ये हा आजार अधून-मधून डोकावत राहतो, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.

या आजारावर उपचार आहेत. मात्र, एक-दीड वर्षे औषधं घ्यावी लागतात. उपचाराची तेवढ्या कालावधीची प्रक्रियाच असते.

ब्रुसेलोसिस बॅक्टेरियाची लक्षणं दिसायला एका आठवड्यापासून दोन महिन्यांपर्यंतचा कालावधी लागू शकतो. मात्र, सामान्यपणे दोन ते चार आठवड्यात लक्षणं दिसतातच.

ताप, घाम येणं, थकवा, भूक न लागणं, डोकं दुखणं, वजन कमी होणं आणि स्नायू दुखणं ही लक्षणं आहेत. यातली काही लक्षणं मोठ्या कालावधीपर्यंत राहतात आणि काही कमी कालावधीसाठी. म्हणजे, वारंवार ताप येणं, सांधेदुखी, अंडकोश सुजणं, हृदय किंवा यकृत सुजणं, मानसिक लक्षणं, थकवा, तणाव इत्यादी.

अनेकदा काही लक्षणं अगदीच सौम्य असतात.

Comments are closed

error: Content is protected !!