अनलॉकनंतर आता ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यातील मंचर या गावात करण्यात आलेल्या आरोग्य सर्वेमध्ये 207 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. एकाच दिवसात ग्रामीण भागात दोनशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची ही पहिलीच घटना ठरली होती.ज्या दिवशी हा सर्वे झाला होता तेव्हा म्हणजेच 9 सप्टेंबरला पुणे ग्रामीण भागात 1152 कोरोनाबाधित आढळले तर 10 सप्टेंबरला 1297 इतके रुग्ण सापडले होते. पुणे ग्रामीण भागात दररोज वाढणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.
ग्रामीण भागात वाढणाऱ्या कोरोनाची कारणे शोधताना प्रामुख्याने समोर आलेलं कारण म्हणजे नागरिकांमध्ये कोरोनाबाबत भीती राहिलेली नाही आणि त्यामुळेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाय योजनांबाबतची उदासीनता असल्याची खंत काही नागरिकांनी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर लोक बिनधास्त बाहेर फिरताना दिसत आहेत. मास्क आणि फिजिकल अंतराबाबत शासनाने सांगितलेल्या सूचनांकडे नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
कोरोना झाल्यानंतर समाज आपल्यावर बहिष्कार टाकेल या भीतीने लक्षणे दिसत असताना चाचणी केली जात नाही, तसेच अंगावर आजार काढला जातो. त्यामुळे त्यांच्यापासून देखील इतरांना घरातील इतर सदस्यांना लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. मला काही होत नाही हा गैरसमज देखील मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात आहेत.
पुण्याजवळील ग्रामीण भागातील मोठी लोकसंख्या ही कामानिमित्त पुणे शहरात दररोज येत असते. अनलॉकनंतर अनेक व्यवहार सुरु झाल्याने पुण्यात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली. त्यामुळे हळूहळू शहरापुरता असलेला संसर्ग ग्रामीण भागात देखील वाढला. असे दिसून येत आहे.
Comments are closed