मुंबई, दि.२६ (punetoday9news) :- देशातील श्रीमंत उद्योगपतीं मध्ये नाव असणारे उद्याेजक अनिल अंबानी यांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली असल्याची माहिती समोर आली आहे . त्यांच्याकडे वकिलाला फी देण्यासाठी पैसे नसल्याने घरातील दागिने विकल्याची माहिती त्यांनी लंडनच्या न्यायालयाला दिली आहे.
अनिल अंबानी यांच्याकडून ५२८१ करोड रुपये वसूल करण्यासाठी चिनी बँकांनी अंबानी यांच्याविरोधात खटला भरला आहे. या खटल्यावर लंडनमध्ये सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान अनिल अंबानी यांनी दागिने विकल्याची माहिती न्यायालयाला दिली असून त्यांनी न्यायालयात सांगितले की “जानेवारी ते जून २०२० दरम्यान मी ९. ९ करोड रुपयांचे दागिने विकले. आता माझ्याकडे कोणतीही मौल्यवान वस्तू शिल्लक नाही.” तसेच आपल्याकडे महागड्या गाड्याही नसल्याचा दावाही त्यांनी केल्याचा सूत्रांनी सांगितले आहे . माझ्याकडे रोल्स रॉयल्स कार नसून, मी साधी कार वापरतो, असेही त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. .
अनिल अंबानी यांनी कोर्टाला दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबर २०१९ ला त्यांच्या खात्यात ४० . २ लाख रुपये होते. तर १ जानेवारी २०२० ला त्यांच्याकडे फक्त २०.८ लाख रुपये शिल्लक राहिले. अंबानी यांनी “माझ्याकडे आता कमाईचे दुसरे कोणतेही साधन नाही. माझी पत्नी आणि तिचे कुटुंबीयच माझा सर्व खर्च उचलतात.” असेही त्यांनी कोर्टाला सांगितले . त्यामुळे धनाढ्य उद्योगपतींच्या यादीत बसणारे अनिल अंबानी यांच्यावर दागिने विकायची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. अंबानी यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी शक्य तितक्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करणार असल्याचे चिनी बँकांनी म्हटले आहे .
अनिल अंबानी ग्रुपवर येस बँकेचे एकूण १२,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. अंबानी २००८मध्ये जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती होते. अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपने येस बँकेचे २,८९२ कोटी रुपयांचं कर्ज न फेडल्याने बँकेने सांताक्रूजमधील (मुंबई)२१,००० चौरस फूटपेक्षा अधिक क्षेत्रफळाची मुख्यालय इमारत आणि दक्षिण मुंबईमधील नागिन महलमधील दोन मजल्यांचा ताबा येस बँकेने जुलै महिन्यात घेतलेला आहे.
Comments are closed