पिंपरी,दि.२८( punetoday9news):-  राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचा कामगार सुधारणा कायद्याला विरोध करीत या विरोधात रणनीती ठरवत आढावा बैठक रविवार २७ सप्टेंबर रोजी संपन्न झाली. यामध्ये सरकार विरोधात निषेध सभा,  निदर्शने, आंदोलने,  कामगार संघटना एकत्र करणे, कामगाराची बाजू भक्कमपणे मांडणे, सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा यासाठी लढा देणे, कामगार कायद्या विरोधात विधेयकाच्या संदर्भात निवेदने तयार करून तहसीलदार, कामगार आयुक्त, राज्य कामगार मंत्री, आणि केंद्रीय कामगार मंत्री यांना देणे, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघ व कामगार कृती समितीच्या आंदोलनात जाहीर पाठींबा देवून त्यामध्ये सहभागी होणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कामगार सेलचे मुख्य सल्लागार अरुण बो-हाडे,  अध्यक्ष  किरण चंद्रकांत देशमुख, सल्लागार विजय लोखंडे, सुदाम शिंदे, राकेश चौधरी, सतिश देशमुख, शिवाजी वलवणकर, आकाश पालकर, दिपक गायकवाड, अविनाश घोगरे, गणेश लंगोटे, नारायण ओंबळे, संदिप शिंदे, दामोदर वहिले,  शंकर जाधव, दिपक मोंडोंकार तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

 देशात कोरोना महामारी मुळे नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने २२ सप्टेंबरला संसदेत विरोधकांच्या अनुपस्थितीत, संसदेत कामगार सुधारणा कायदा मंजूर करून घेतला. कायदा करताना कामगार संघटनांही विश्वासात घेतले गेले नाही हे ही यातून दिसून येते. कायम स्वरूपातील कामगारांना कॉन्ट्रॅक्ट मध्ये घेण्याची किंवा कमी करण्याचे अधिकार मंजूर झालेल्या कामगार विधेयकात कंपनीला देण्यात आले आहेत.  कंपनी विरोधात संप करण्यासाठी आधी कंपनी व्यवस्थापणाला लेखी कळवावे लागेल त्यानंतरच संप करता येणार आहे. ३०० कामगारापर्यतच्या कोणत्याही कंपनीला,आपली कंपनी केव्हाही बंद करण्यासाठी सरकारची पुर्वपरवानगीची आवश्यकता नाही. कोणत्याही कर्मचाऱ्यांना केव्हाही काढण्याची मुभा देण्यात आली आहे. सरकारला कळविण्याची गरज नाही. सरकारचे हे धोरण कामगारांच्या विरोधात असून मालक वर्गाला साथ देणारे आहे त्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबामध्ये भितीचे वातावरण निर्माण  झाले आहे सरकार ने हे विधेयक आणुन कामगार व त्याची संघटना संपवण्याचा डाव आखला आहे.  असे मत पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलचे अध्यक्ष किरण चंद्रकांत देशमुख यांनी व्यक्त केले.

Comments are closed

error: Content is protected !!