मुंबई, दि. ३० ( punetoday9news):- संघ लोकसेवा आयोग अर्थात UPSC मार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने हि परीक्षा आता 04 ऑक्टोबर 2020 रोजी होणार हे निश्चित आहे.
सदरील परीक्षा पुढे ढकलण्यास कोर्टाने नकार दिला आहे. ‘उमेदवाराला परीक्षेच्या जादा प्रयत्नाच्या पर्यायावर विचार करावा’ या मुद्द्यावर आयोगाला विचार करायला सांगू असेही कोर्टाने म्हटले.
कोरोना विषाणू संसर्ग सध्या जोर धरत असल्याने नागरी सेवा परीक्षा 2-3 महिने पुढे ढकलण्यात यावी अशी याचिका कोर्टामध्ये वकील अलख आलोक श्रीवास्तव यांच्यामार्फत दाखल करण्यात आली होती.
अनेक भागात सध्या अतिवृष्टीचे संकट असल्याचेही याचिकाकर्त्यांनी नमूद केले होते. सदरील प्रकरणी न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर, बी.आर. गवई आणि कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने यापूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून वयाची 21 वर्ष पूर्ण असलेले परीक्षार्थी आवश्यक ती काळजी घेतील. त्यामुळे परीक्षा आता नियोजित तारखेला होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
Comments are closed