मुंबई, दि. ३० ( punetoday9news):-
राज्यभरात ‘अंगणवाडी ताईं’नी कोविड कालावधीत अतिशय कौतुकास्पद कामगिरी बजावली आहे. त्या ‘कोविड योद्धा’ आहेत, त्यांना योग्य सन्मान, प्रोत्साहन मिळेल, असे उपक्रम विभागाकडून राबविले जातील, अशा महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आज म्हणाल्या.
मंत्री ॲड. ठाकूर यांची आज युनिसेफच्या राजलक्ष्मी नायर व अल्पा व्होरा यांनी भेट घेतली. यावेळी राज्यातील बालके, किशोरवयीन मुली, अंगणवाडी ताई यांच्याकरिता भविष्यात करता येणाऱ्या कार्यक्रमांबाबत चर्चा झाली.
यावेळी बोलताना ॲड. ठाकूर म्हणाल्या, कोरोना काळात अंगणवाडी ताईंनी घराघरात सर्वेक्षण, पोषण आहार यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. आदिवासी भागातील अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांच्याशी झूम कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जातील. बंद झालेल्या लोकाभिमुख योजना पुन्हा सुरु करण्याबाबत आढावा घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.
बालविवाह ही चिंतेची बाब असल्याचे सांगून ॲड. ठाकूर यांनी म्हणाल्या की, बालविवाहांना आळा घालण्यासाठी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच मानसिकतेमध्ये बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रबोधन आणि इतर उपाययोजनांच्या अनुषंगाने लवकरच बैठक घेण्यात येईल. १८ व्या वर्षी अनाथगृहातून बाहेर पडणाऱ्या मुलांच्या भविष्याकरिता ठोस कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आरोग्य, आदिवासी विकास, शिक्षण, गृह अशा शासनाच्या विविध विभागांचा समन्वय साधत महिला व बालकांच्या विकासासाठी रोडमॅप युनिसेफकडून तयार करण्यात येणार आहे.
Comments are closed