उत्तर प्रदेश दि.१(punetoday9news) :- उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या आरोपांनंतर असंतोषाचं वातावरण निर्माण झाले . या प्रकरणावरून काँग्रेस पक्षाने योगी आदित्यनाथ सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

हाथरस प्रकरणावरून सोनिया गांधी यांनी टीका केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हाथरसकडे रवाना झाले होते. दरम्यान त्यांना रोखून उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्काबुक्की करून त्यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे

गुरुवारी (1 ऑक्टोबर) सकाळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी नोएडामार्गे हाथरसकडे रवाना झाले होते. ग्रेडर नोएडा येथे यमुना एक्सप्रेस वेवर पोलिसांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. यानंतर राहुल गांधी गाडीतून उतरून चालत पुढे निघाले.

यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवले . त्यांच्यासोबत धक्काबुक्की केली. तसेच त्याठिकाणी लाठीमार झाल्याचा आरोपही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे.

राहुल गांधी यावेळी पोलिसांना म्हणाले, “मी एकटा जाणार आहे. मी शांततेत जाईन. कलम १४४ नुसार गर्दी करू शकत नाही. सभा होऊ शकत नाही. त्यामुळे मी एकट्याने जाईन. आणि तरीही मला का जाऊ दिले जात नाही तसेच मला कोणत्या कलमांनुसार अटक करण्यात येत आहे?”

उत्तर प्रदेशात एकामागून एक बलात्काराचे प्रकरण समोर येताना दिसल्यामुळे काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Comments are closed

error: Content is protected !!