उत्तरप्रदेश,दि.१ (punetoday9news) :- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्या राज्यांना सल्ले देत बसले आहेत. यापेक्षा त्यांनी त्यांच्या राज्यातील गुन्हेगारीवर लक्ष केंद्रित करावं आणि जंगलराजवर कडक कारवाई करावी असा सल्ला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आदित्यनाथांना दिला आहे.
“योगी आदित्यनाथ यांचे सरकार अमानवी आहे. कुटुंबीयांच्या गैरहजेरीत मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हे वागणं अमानवी आणि दुर्देवी आहे. मुलींना जिवंतपणी सन्मान मिळतो ना मेल्यानंतर. योगी आदित्यनाथ वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात. केवळ महाराजांचं नाव घेण्यापेक्षा शिवाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना न्याय, सन्मान आणि समतेचं राज्य निर्माण करता येत नसेल तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही”, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
“उत्तर प्रदेशमध्ये आता कायद्याचे राज्य राहिलेले नाही तर योगींच्या खास लोकांचं राज्य आले आहे. योगी हे महाराज आहेत परंतु राज्य राजासारखे चालवत असून हे लोकशाहीला घातक आहे”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपतींना याप्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. “हाथरस घटनेतील पीडितेवर पोलिसांनी कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत परस्पर अंत्यसंस्कार केले. या भयंकर घटनेमुळे देशभरात चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत”, अशी विनंती करणारे पत्र शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपतींना लिहिले आहे.
“आरोपींना जामीन मिळू नये, न्यायालयीन कार्यवाहीसाठी अनुभवी आणि कार्यक्षम सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी, पुरेसे आणि योग्य पुरावे सादर करण्यात यावेत, न्यायालयात आरोपपत्र वेळीच दाखल करण्यात यावे, साक्षीदारांना पोलीस संरक्षण मिळावे, आरोपींना फाशी व्हावी यासाठी उत्तर प्रदेश सरकारने आपल्या वकिलांना कायदेशीर मदत द्यावी”, अशा मागण्या नीलम गोऱ्हे यांनी केल्या आहेत.
Comments are closed