1
            पुणे,दि.२६ : कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना  सोबत घेवून त्यांनी केलेल्या योग्‍य सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
            विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक ज्‍येष्‍ठ नेते तथा  खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,  गृहमंत्री अनिल देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे  यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांनी लोकप्रतिनिधींना नियमित संपर्क करावा. तसेच  अधिकाऱ्यांनी त्‍यांना  नेमून दिलेल्या जबाबदारीप्रमाणे काम करावे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध राबवावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
             उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  कोरोनाच्‍या लढाईत पुणे महानगरपालिकेने आर्थिक भार सहन केला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेण्यात येईल. कोरोना प्रतिबंधासाठी कॅन्टोमेंट बोर्डसाठी आणखी एक कोटी रुपयांचा निधी देण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.  सर्वांनी समन्‍वयाने काम  केल्यास आपण कोरोनाची लढाई निश्चितपणे जिंकू, असा  विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोनाविषयक चाचण्‍यांचे प्रमाण वाढवा- ज्‍येष्‍ठ नेते व खासदार शरद पवार
   ज्‍येष्‍ठ नेते व खासदार शरद पवार यांनी इंडियन कौन्‍सील ऑफ मेडीकल रिसर्चच्‍या मार्गदर्शक  सुचनांनुसार कार्यवाही करण्‍यात यावी, तसेच कोरोनाविषयक चाचण्‍यांचे प्रमाण वाढविण्‍याच्‍या सूचना केल्‍या. प्रतिबंधीत क्षेत्राचाही नियमित आढावा घ्‍यावा. खाजगी रुग्‍णालयातील कोरोनाच्‍या रुग्णांवरील उपचारांसाठी  अवाजवी शुल्‍क आकारणी  होणार नाही यासाठी  आवश्‍यक ती कार्यवाही करावी, असेही ते म्‍हणाले.
             कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनेचा भाग म्हणून मुंबई शहराच्या धर्तीवर पुणे शहरासह जिल्ह्यात ‘मुंबई पॅटर्न’ राबवा, असे निर्देश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिले. मुंबई शहराच्या धर्तीवर पुण्यात उपाययोजना करण्याची गरज आहे. . कोरोनाबाधित रुग्णांकडून जादा पैसे घेणाऱ्या व शासकीय निर्देशाचे पालन न करणाऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णावर मोफत उपचार करावा अशा सूचनाही दिल्या.
            आरोग्य मंत्री  टोपे म्हणाले,  स्थानिक प्रशासनाने लोकप्रतिनिधींना सोबत घेवून काम करावे, लोकांच्या मनात कोरोना विषाणूविषयीची भीती  कमी करण्यासाठी प्रयत्न केला जावा. जनजागृती करण्यावर भर द्यावा.
 राज्यात ॲण्टीजेन चाचणी पाठोपाठ ॲण्‍टीबॉडीज चाचण्या करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये किती लोकांना संसर्ग झाला याची माहिती या चाचणीद्वारे मिळणार आहे.
            कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा  एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्या वतीने निश्चित करण्यात आलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक विनाकारण फिरतांना आढळून येत असल्‍याच्‍या तक्रारीच्‍या पार्श्‍वभूमीवर  महानगरपालिका व पोलीस विभागाने प्रतिबंधित क्षेत्रात कडक निर्बंध राबवावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज दिले.
            गृहमंत्री देशमुख म्हणाले, लॉकडाऊन  कालावधीत तसेच लॉकडाऊन  शिथील झाल्यानंतर सोशल मिडीयाचा फार मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून वापर करण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमाणात सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढतांना दिसून येत आहे.  त्यामुळे फेकन्यूज, नागरिकांचे फसवणुकीचे प्रकार इत्यादी बाबी घडतांना दिसून येत आहे. यावर आळा घालण्यासाठी एका सायबर विषयक तज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे सायबर गुन्हे कमी होण्यास मदत होणार आहे.
            खासदार अमोल कोल्हे यांनी मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे सांगून रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण, रुग्णांना देण्यात येणारी औषधे, रॅपिड टेस्टिंग टेस्‍ट ची सेन्सिटीव्हीटी तपासणे  आदी बाबींचा नव्याने अभ्यास होणे गरजेचे आहे, असे सांगितले.
            आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार शरद रणपिसे, आमदार चेतन तुपे, आमदार भिमराव तापकीर, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार सुनील टिंगरे, आमदार सुनील शेळके आदी लोकप्रतिनिधींनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या.
 बातमी साठी संपर्क :-
पत्रकार- सागर झगडे.
Punetoday9news@gmail.com
9922557929.

#

Comments are closed

error: Content is protected !!