पुणे,दि.५ (punetoday9news):- पुणे शहरातील खराडी परिसरात एका मोकळ्या मैदानावर कुख्यात गुंडाचा दगडांनी ठेचून खून करण्यात आला. आज पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. शैलेश घाडगे (वय ३३) असे खून झालेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. चंदननगर पोलिस स्टेशन मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खराडी तील नैवेद्यम हॉटेल शेजारी असणाऱ्या मैदानाजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. चंदनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता तो मृतदेह कुख्यात गुंड शैलेश घाडगे याचा असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना बोलावले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शैलेश घाडगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान हा खून कोणी आणि का केला हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. मात्र पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुण्यात दोन दिवसात हत्येच्या दोन घटना घडल्या आहे. शहरातील बुधवार पेठ परिसरात सहा जणांनी केलेल्या खुनी हल्ल्यात दीपक मारटकर या शिवसेनेच्या माजी दिवंगत नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू झाला . पुणे शहराच्या मध्यवस्तीत हा प्रकार घडल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे
Comments are closed