पुणे दि.२७ : – आषाढी वारीची परंपरा चालू ठेवण्यासाठी प्रतिकात्मकरित्या व प्रतिनिधीक स्वरुपात काही महत्वाच्या संतांच्या पादुका ज्या परंपरेने विठ्ठल – रुक्मणीच्या भेटीस जातात. त्यांना मर्यादित स्वरुपात व केवळ संतांच्या पादुका एसटी्द्वारे अथवा वाहनाद्वारे आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच 30 जून 2020 रोजी दशमीला श्री क्षेत्र पंढरपुर येथे नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची, जि.पुणे , श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता.हवेली, जि.पुणे, श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे व श्री संत चांगवटेश्वर देवस्थान,श्रीक्षेत्र सासवड, जि.पुणे या चार पालखी संतांच्या पादुका घेवून परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमणूका करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
दरवर्षी आषाढी वारीमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून मोठया प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक संतांच्या पालखी सोबत पंढरपूर येथे जात असतात. सध्या महाराष्ट्रात मोठया प्रमाणात कोरोना संसर्गाच्या वाढीस आळा घालणेसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वसामान्य नागरीकांना व जनतेला होऊ नये यासाठी पायी-पालखी वारी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची, जि.पुणे करीता उपविभागीय अधिकारी, खेडचे संजय तेली , श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू, ता.हवेली, जि.पुणे करीता महसूल नायब तहसिलदार, हवेलीचे संजय भोसले , श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे करीता निवासी नायब तहसिलदार, दौंडचे सचिन आखाडे , श्री संत चांगवटेश्वर देवस्थान, श्रीक्षेत्र सासवड, जि.पुणेकरीता महसूल नायब तहसिलदार, पुरंदरचे उत्तम बढे अशा प्रकारे नुसार इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमणूका करण्यात आल्या आहेत.
नेमणुका करण्यात आलेल्या इन्सीडेंट कमांडर यांनी पादुका प्रस्थान केल्यापासून ते परत प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत नेमून दिलेल्या पालखी संस्थांच्या सोबत राहणे आवश्यक असून संबंधित उपविभागीय अधिकारी व संस्थानच्या प्रमुखांशी विचार विनिमय करुन पादूकांचा मार्ग निश्चित करावा व सदर पादुका घेवून जाणा-या बसेस पंढरपूर येथे रात्री ११ वाजेपर्यंत पोहचतील याबाबत योग्य ते नियोजन करण्यात यावे. प्रवासा दरम्यान दर्शनाला कोणत्याही ठिकाणी बस थांबविण्यात येऊ नये. तसेच संतांच्या पादुकांसोबत जाणा-या सर्व व्यक्तींनी मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे अशा सुचना करण्यात आल्या आहेत.
Comments are closed